- गौरीशंकर घाळे, मिलिंद बेल्हे, मनोज मुळ्येमुंबईतील काँग्रेस नेत्यांची ताकद अंतर्गत राजकारणातच खर्ची पडते. गुरूवारी जाहीर झालेल्या निकालाने याच गृहितकाला पुन्हा एकदा बळकटी दिली आहे. एकजुटीने लढणारी युती आणि विस्कळीत काँग्रेसजन अशा विषम लढाईत मुंबईतील सहाही जागांवर भाजप - शिवसेनेचे उमेदवार दणक्यात विजयी झाले आहेत.
मिलिंद देवरा, प्रिया दत्त, संजय निरूपम, एकनाथ गायकवाड आणि अभिनेत्री उर्मिला मातोंडकर, असे पाच उमेदवार काँग्रेसने उभे केले होते. या सर्वांना दारूण पराभवाचा सामना करावा लागला. राष्ट्रवादीचे संजय दिना पाटीलसुद्धा मोठ्या फरकाने पराभूत झाले. गेली किमान पंधरा वर्षे मुंबईतील काँग्रेस आघाडीचे नेतृत्व आणि समस्या कायम आहेत. मधल्या काळात संजय निरूपम मुंबईचे अध्यक्ष होते. युतीविरोधात आक्रमक पवित्रा घेताना पक्षातील अन्य नेत्यांना सोबत घ्यायची त्यांची तयारी नव्हती. कार्यकर्त्यांची नवी फळी, नवे नेतृत्व उभे करण्यापेक्षा देवरा, दत्त आणि गायकवाड घराण्याभोवतीच मुंबई काँग्रेसचे राजकारण घुटमळत राहिले. प्रिया दत्त यांनी तर सहा महिन्यांपूर्वी राजकारणातून निवृत्ती जाहीर केली होती. नंतर देवरांनीही तसेच संकेत दिले होते. शेवटी नाइलाजने त्यांच्या गळ्यात उमेदवारीची माळ घालावी लागली.
पक्ष संघटना नसेल तर एखादा फिल्मी सिताराही भविष्य बदलू शकत नाही, हे उत्तर मुंबईतील उर्मिलाच्या पराभवाने अधोरेखित केले. आघाडीच्या जागावाटपात मुंबईतील सहापैकी ईशान्य मुंबईची एकमेव जागा राष्ट्रवादीकडे आहे. संजय दिना पाटील तिथे राष्ट्रवादीचे उमेदवार. नववर्षानिमित्त १ जानेवारीला ‘मी येतोय’ या मथळ्याने त्यांचे काही बॅनर झळकले. इतकी वर्षे कुठे गेले होते, येणार म्हणजे भाजपात की आणखी कुठे? अशी चर्चाही तेंव्हा रंगली होती. पुढे, मनसे आणि राष्ट्रवादीची जवळीक वाढत गेली तशी ईशान्यमधून इंजिनाला वाट मोकळी करून देण्याची चर्चाही रंगल्या. अखेर इंजिनाच्या शिट्टीने घड्याळ चालू ठेवण्याचा प्रयत्नही मतदारसंघात पार फसला. गेली दहा वर्षे आघाडीने तेचे ते चेहरे मुंबईकरांच्या माथी मारले. केवळ निवडणुकीच्या तोंडावर मुंबईकरांना त्यांच्या दर्शनाचा लाभ मिळतो. संघटनेच्या माध्यमातून पक्षाच्या धेयधोरणांसाठी झटणारी, जनआंदोलनांच्या माध्यमातून मुंबईकरांच्या प्रश्नांसाठी ‘सतत’ संघर्षरत राहण्याची तयारी असलेले नेतृत्व निर्माण करण्याचे कष्ट जोवर काँग्रेस आघाडी घेणार नाही तोवर २०१४ आणि २०१९ सारखेच निकाल आघाडीच्या वाट्याला येत राहतील.