सर्व विद्यापीठांमध्ये समान अभ्यासक्रम
By Admin | Updated: November 22, 2014 03:03 IST2014-11-22T03:03:16+5:302014-11-22T03:03:16+5:30
राज्यातील सर्व विद्यापीठांमध्ये समान अभ्यासक्रम आणि समान परीक्षा असाव्यात, असे मत राज्यपाल आणि कुलपती सी.विद्यासागर राव यांनी आज व्यक्त केले

सर्व विद्यापीठांमध्ये समान अभ्यासक्रम
मुंबई : राज्यातील सर्व विद्यापीठांमध्ये समान अभ्यासक्रम आणि समान परीक्षा असाव्यात, असे मत राज्यपाल आणि कुलपती सी.विद्यासागर राव यांनी आज व्यक्त केले. राज्याचा समतोल विकास साधताना आर्थिक प्रगतीबरोबरच सामाजिक प्रगतीवर लक्ष दिले पाहिजे, सूचनाही त्यांनी केली.
राज्यपालांनी आज राजभवन येथे वित्त व नियोजन, शालेय शिक्षण, उच्च व तंत्रशिक्षण आणि आदिवासी विकास या विभागांचा आढावा घेतला. महाराष्ट्रासमोर आज अनेक आव्हाने आणि समस्या आहेत. बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह वित्त व नियोजन मंत्री सुधीर मुनंगटीवार, शिक्षण मंत्री विनोद तावडे, आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा उपस्थित होते.
राज्यपालांनी विद्यापीठांची स्वायतत्ता, त्याअंतर्गत येणारे कायदे, विद्यापीठामधील अभ्यासक्रम, दर्जेदार शिक्षणाची आवश्यकता तसेच मागास भागात विद्यापीठांची उपयुक्तता वाढविणे या विषयांवर भर देणे आवश्यक असल्याचे नमूद केले. याशिवाय सर्व विद्यापीठांमध्ये एकसमान अभ्यासक्रम आणि समान परीक्षा असण्यावर त्यांनी भर दिला. अभियांत्रिकीच्या प्रवेशाचा प्रश्न राज्यात गंभीर असून तो राज्य शासनाने तातडीने हाताळणे आवश्यक आहे, असे ते म्हणाले. इंडियन सायन्स काँग्रेसच्या आयोजनाची संधी मुंबई विद्यापीठाला मिळाली आहे. पुढील वर्षी जानेवारीत ही परिषद मुंबईत होत आहे. त्यासाठी राज्य शासनाने सहकार्य करावे, असे राज्यपाल म्हणाले. यावेळी मुख्य सचिव स्वाधिन क्षत्रिय आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. (विशेष प्रतिनिधी)