अजय गावंड हत्येप्रकरणी साळवीला पोलीस कोठडी
By Admin | Updated: November 18, 2014 02:59 IST2014-11-18T02:59:33+5:302014-11-18T02:59:33+5:30
पोलीस शिपाई अजय गावंड यांची हत्या करणाऱ्या संतोष साळवी (३१) या तरुणाला न्यायालयाने २४ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

अजय गावंड हत्येप्रकरणी साळवीला पोलीस कोठडी
मुंबई : पोलीस शिपाई अजय गावंड यांची हत्या करणाऱ्या संतोष साळवी (३१) या तरुणाला न्यायालयाने २४ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. चौकशीत साळवी चोरीसाठी इमारतीत शिरलो नव्हतो, असे सांगतो आहे. तूर्तास पोलीस त्याची पार्श्वभूमी काढत आहेत. तसेच त्याच्याकडे कसून चौकशीही सुरू आहे.
वाडीबंदरच्या दुमजली इमारतीच्या गच्चीवर साळवी संशयास्पदरीत्या पोहोचला होता. ही माहिती मिळताच सहकाऱ्यांसह गावंड तेथे पोहोचले. ते दुसऱ्या मजल्यावरील खोलीच्या खिडकीतून पाइपलाइनच्या साहाय्याने गच्चीवर चढण्याच्या प्रयत्नात होते. हे पाहून साळवी त्यांच्यावर चालून गेला. त्याही अवस्थेत गावंड साळवीची समजूत काढत होते. त्याच्याशी शांतपणे, गोड बोलून विश्वास निर्माण करू पाहात होते. स्वत:ला पोलिसांच्या हवाली कर, तुला काही होणार नाही, तू काही गुन्हा केलेला नाहीस मग कशाला घाबरतोस, अशी समज देत होते. गावंड पाइपला लटकून गच्चीवर पोहोचणार इतक्यात साळवीने त्यांच्या डोक्यात लाकडी बांबू घातला. यात त्यांचा मृत्यू झाला.
साळवीला हत्येच्या गुन्ह्यात अटक केली. न्यायालयाने त्याला २४पर्यंत पोलीस कोठडीत ठेवले आहे. मात्र मूळचा पुण्याचा साळवी याच इमारतीत का शिरला, गच्चीवर त्याने स्वत:ला कोंडून का घेतले, यासाठी पोलीस त्याच्याकडे अधिक चौकशी करीत आहेत. चौकशीत तो मी चोरी करण्यासाठी इमारतीत शिरलो नव्हतो, असे पोलिसांना सांगतो आहे. त्याच्याविरोधात मुुंबईत एकही गुन्हा नाही. पुण्यातील पार्श्वभूमी
पोलीस पडताळून पाहत
आहेत. (प्रतिनिधी)