सलमानची गहाळ कागदपत्रे पोलीस ठाण्यातच सापडली
By Admin | Updated: August 27, 2014 04:24 IST2014-08-27T04:24:38+5:302014-08-27T04:24:38+5:30
सिनेअभिनेता सलमान खानच्या हिट अॅण्ड रन प्रकरणातील गहाळ झालेली कागदपत्रे वांद्रे पोलीस ठाण्यातच सापडली. मात्र ही कागदपत्रे पोलीस ठाण्यातच होती

सलमानची गहाळ कागदपत्रे पोलीस ठाण्यातच सापडली
मुुंबई : सिनेअभिनेता सलमान खानच्या हिट अॅण्ड रन प्रकरणातील गहाळ झालेली कागदपत्रे वांद्रे पोलीस ठाण्यातच सापडली. मात्र ही कागदपत्रे पोलीस ठाण्यातच होती तर खटल्याच्या सुनावणीदरम्यान न्यायालयात सादर का झाली नाहीत? ही कृती हेतुपुरस्सर झाली का, हे शोधून काढण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून चौकशी सुरू आहे.
कागदपत्रे गहाळ झाल्याने सलमानविरोधातील खटल्यात तीन वेळा सुनावणी तहकूब करावी लागली होती. या गुन्ह्यात वांद्रे पोलिसांनी नोंदविलेल्या एकूण साक्षीदारांपैकी फक्त सात जणांचे जबाब न्यायालयात दाखल झाले. उर्वरित ६३ जणांचे जबाब मिळत नाहीत, असा दावा सरकारी वकिलांनी केला होता. त्यापाठोपाठ या गुन्ह्यात पोलिसांनी नोंदवलेली केस डायरीही गहाळ झाली, ही माहिती न्यायालयाला देण्याची नामुष्की सरकारी पक्षावर ओढवली. या प्रकरणाची गंभीर दखल घेत न्यायालयाने पोलिसांवर ताशेरे ओढत सरकारी पक्षाला भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश दिले. पुढील सुनावणी १२ सप्टेंबरला होणार आहे.
सहपोलीस आयुक्त (कायदा व सुव्यवस्था) धनंजय कमलाकर यांच्या माहितीनुसार, कागदपत्रे गहाळ कशी झाली, याची चौकशी सुरू आहे. आता गहाळ कागदपत्रे मुद्दाम दडवून ठेवण्यात आली होती का, कागदपत्रे पोलीस ठाण्यात असूनही न्यायालयात का सादर झाली नाहीत, याची सखोल चौकशी करून जबाबदारी निश्चित करण्यात येईल. (प्रतिनिधी)