सलमानची सुनावणी एक आठवड्याने
By Admin | Updated: July 21, 2015 01:53 IST2015-07-21T01:53:10+5:302015-07-21T01:53:10+5:30
सत्र न्यायालयाने ठोठावलेल्या पाच वर्षांच्या शिक्षेविरोधात अभिनेता सलमान खानने केलेल्या अपील याचिकेवरील सुनावणी उच्च न्यायालयाने सोमवारी

सलमानची सुनावणी एक आठवड्याने
मुंबई : सत्र न्यायालयाने ठोठावलेल्या पाच वर्षांच्या शिक्षेविरोधात अभिनेता सलमान खानने केलेल्या अपील याचिकेवरील सुनावणी उच्च न्यायालयाने सोमवारी एक आठवड्यासाठी तहकूब केली.सलमानच्या अपघात खटल्याला स्थगिती द्यावी, अशी मागणी करणारा अर्ज शशिकला गांगुर्डे यांनी केला होता. गांगुर्डे यांच्या पतीला हत्येप्रकरणी सत्र न्यायालयाने शिक्षा ठोठावली आहे. त्यांनी या शिक्षेविरोधात २००९मध्ये अपील याचिका केली आहे.
मात्र, या याचिकेवर अद्याप सुनावणी झालेली नाही. पण, अभिनेता शायनी अहुजा व सलमान खानने शिक्षेविरोधात केलेल्या अपील याचिकांवर तत्काळ सुनावणी होते. हे गैर असून, सलमानच्या अपील याचिकेला स्थगिती द्यावी, अशी मागणी अर्जात करण्यात आली होती. न्या. ए.आर. जोशी यांनी हा अर्ज फेटाळला. त्याचवेळी गांगुर्डे यांनी यासाठी स्वतंत्र याचिकाही केली.
या याचिकेवर मुख्य न्यायाधीश मोहित शहा यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. त्यात न्यायालयाने न्यायालय प्रशासनाला प्रलंबित अपील याचिकांचा तपशील सादर करण्याचे आदेश दिले आहेत. (प्रतिनिधी)