कोर्टाची वारी करून सलमान सायंकाळी घरी परतला

By Admin | Updated: May 7, 2015 01:52 IST2015-05-07T01:52:48+5:302015-05-07T01:52:48+5:30

उच्च न्यायालयाने दोन दिवसांसाठी अंतरिम जामीन मंजूर केल्याने सलमान खान तुरुंगात न जाता संध्याकाळी घरी परतला.

Salman returned home late by the court | कोर्टाची वारी करून सलमान सायंकाळी घरी परतला

कोर्टाची वारी करून सलमान सायंकाळी घरी परतला

तब्बल तेरा वर्षांनी झाला फैसला : शिक्षा ऐकताच डोळे पानावले, मानही गेली खाली

मुंबई : दारूच्या नशेत भरधाव गाडी चालवून वांद्रे येथील फूटपाथवर झोपलेल्या बेकरीतील एका कामगाराच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याबद्दल बॉलीवूड अभिनेता सलमान खान याला सत्र न्यायालयाने मंगळवारी सदोष मनुष्यवधासाठी दोषी ठरवून शिक्षा ठोठावली; परंतु यानंतर काहीतासांतच उच्च न्यायालयाने दोन दिवसांसाठी अंतरिम जामीन मंजूर केल्याने सलमान खान तुरुंगात न जाता संध्याकाळी घरी परतला. सलमानला झालेली शिक्षा आणि त्याचा तूर्तास टळलेला तुरुंगवास यावर दिवसभर संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या व सलमानच्या असंख्य चाहत्यांसह एकूणच चित्रपटसृष्टीने सुटकेचा नि:श्वास सोडला.
दि. २८ सप्टेंबर २००२ च्या रात्री रस्ता सोडून फूटपाथवर चढलेल्या सलमानच्या टोयोटा लॅन्ड क्रुझर मोटारीखाली चिरडून अमेरिकन बेकरीतील नुरुल्ला मेहबूब शरीफ हा कामगार झोपेतच ठार झाला होता. याखेरीज त्याच्या सोबत झोपलेले इतर चार कामगार जखमी झाले होते. गेली १३ वर्षे विविध कारणांनी रेंगाळलेल्या या खटल्याचा निकाल अतिरिक्त सत्र न्यायाधीश दिलीप वासुदेवराव देशपांडे यांनी मंगळवारी दुपारी खच्चून भरलेल्या न्यायालयात जाहीर केला. सदोष मनुष्यवधासह सर्व आठही गुन्ह्यांत दोषी ठरविण्यात येत असल्याचे न्यायाधीश देशपांडे यांनी जाहीर केले, तेव्हा सलमानच्या चेहऱ्यावर अविश्वासाचा भाव होता व पाणावलेले डोळे शर्टाच्या बाहीने पुसतानाही तो दिसला. सुमारे पाऊण तासाने न्यायाधीशांनी सिद्ध झालेल्या गुन्ह्यांसाठी शिक्षा सुनावल्या, तेव्हा खाली मान घालून बसलेला सलमान मानसिकदृष्ट्या बराच सावरलेला जाणावला.
सदोष मनुष्यवध (कलम ३०४-भाग २), बेदरकारपणे वाहन चालविणे (कलम २७९), प्राणघातक कृतीने दुखापत करणे (कलम ३३७), गंभीर दुखापत करणे (कलम १३८) निष्काळजीपणाने मालमत्तेचे नुकसान करणे (कलम ४२७) या भारतीय दंड विधानाच्या गुन्ह्यांखेरीज परावान्याशिवाय वाहन चालविणे (मोटार वाहन कायदा कलम ३४(ए) व (बी) आणि कलम १८५) तसेच मद्यप्राशन  करून वाहन चालविणो (दारुबंदी कायदा कलम 185) यासाठी सलमान खानला विविध कालावधीच्या तुरुंगवासाच्या शिक्षा ठोठावण्यात आल्या. या घटनेतील मृत व जखमींना द्यायच्या भरापईपोटी सलमानने यापूर्वीच उच्च न्यायालयात 19 लाख रुपये जमा केले असल्याने सत्र न्यायालयाने त्याला स्वतंत्रपणो दंड ठोठावला नाही.

शिक्षा तीन वर्षाहून अधिक असल्याने सत्र न्यायालय शिक्षेला स्थगिती किंवा जामीन देऊ शकत नव्हते. त्यामुळे सलमान खानच्या वकिलांनी आधीच तयार करून ठेवलेला जामीन अर्ज लगेच उच्च न्यायालयात दाखल केला. त्यावेळी त्यांच्या हाती सत्र न्यायालयाने दिलेल्या आदेशात्मक निकालाची केवळ दोन पाने होती. वरिष्ठ वकील हरीष साळवे यांना तातडीने उभे करून सलमानचा हा जामीन अर्ज सायंकाळी न्या. अभय ठिपसे यांच्यासमोर सुनावणीसाठी आणण्यात आला. निदान निकालपत्रची सविस्तर प्रत मिळेर्पयत तरी सलमानला अंतरिम जामीन द्यावा, अशी विनंती अॅड. साळवे यांनी केली. प्रॉसिक्युटर संदीप शिंदे यांनी निकालाची प्रत नसताना सलमानच्या जामिनावर विचार करण्यास विरोध केला. गेली 12 वर्षे सलमान खान जामिनावर होता. आता निकालाची प्रत मिळेर्पयत त्यास संरक्षण दिले नाही तर त्यास लगेच तुरुंगात जावे लागेल. त्यामुळे जामीन अर्जावर शुक्रवारी सुनावणी ठेवून तोर्पयत सलमानला अंतरिम जामीन मंजूर करणो न्यायाचे ठरेल, असे न्या. ठिपसे यांनी नमूद केले. सविस्तर निकालपत्र तयार नव्हते तर आजच निकाल दिला नसता तरी चालू शकले, असते असे भाष्यही त्यांनी केले. अंतरिम जामिनाची प्रक्रिया करून सायंकाळी 7.40 च्या सुमारास सलमान घराकडे रवाना झाला.

---------
आज आमच्यासाठी मोठा दिवस आहे. आम्ही एकटे, एकाकी पडलेलो नाही. फॅन्सच्या प्रार्थना, प्रेम आणि पाठिंबा आमच्यासोबत आहे.- अर्पिता खान-शर्मा, सलमानची बहीण
----------
कायद्यापेक्षा कोणी मोठा नाही
मुंबई पोलिसांनी योग्य सहकार्य केले नाही. साक्षीदार समोर आणण्यात पोलीस अपयशी ठरले. तरीही न्यायालयाने दिलेली शिक्षा योग्य आहे. कमाल खान आणि अशोक सिंग यांच्यावरही न्यायालयाने कठोर कारवाई करायला हवी. न्यायालयाने दिलेल्या शिक्षेमुळे कायद्यापेक्षा कोणीही मोठा नाही, हे सिद्ध झाले. त्यामुळे गुन्हेगारांवर कायद्याचा वचक राहील. - अ‍ॅड. आभा सिंग, अर्जदार
-----------
न्यायालयात सलमानचे कुटुंब
सलमानचा निकाल ऐकण्यासाठी अलवीरा, अर्पिता, अरबाज, सोहेल या भावंडांसह अभिनेता अतुल अग्निहोत्री, माजी आमदार बाबा सिद्दिकी आदी मंडळी उपस्थित होती. निकाल योग्य नसल्याचे अरबाज सांगत होता.

Web Title: Salman returned home late by the court

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.