सलमान खोटारडा, जखमींना मदत न करताच पळला!

By Admin | Updated: May 8, 2015 04:56 IST2015-05-08T04:56:29+5:302015-05-08T04:56:29+5:30

अनेकांचा आदर्श व प्रसिद्ध अभिनेता असूनही सलमान खान अपघात झाल्यानंतर जखमींना मदत न करताच पळला. त्याच्यासारख्या अभिनेत्याला मदत करणे सहज शक्य होते. पण

Salman Khotarada, left without help to the injured! | सलमान खोटारडा, जखमींना मदत न करताच पळला!

सलमान खोटारडा, जखमींना मदत न करताच पळला!

अमर मोहिते, मुंबई
अनेकांचा आदर्श व प्रसिद्ध अभिनेता असूनही सलमान खान अपघात झाल्यानंतर जखमींना मदत न करताच पळला. त्याच्यासारख्या अभिनेत्याला मदत करणे सहज शक्य होते. पण त्याने ती केली नाही व पळून गेला. यावरून त्याचे वर्तन काय आहे हे लक्षात येते, असा ठपका सत्र न्यायालयाने ठेवला आहे.
हिट अ‍ॅण्ड रन प्रकरणी सलमानला पाच वर्षांची शिक्षा ठोठावताना सत्र न्यायाधीश डी.डब्ल्यू. देशपांडे यांनी सलमानच्या खोटेपणाचे विस्तृत विश्लेषण २४० पानी निकालपत्रात केले आहे. निकालाची  प्रत ‘लोकमत’च्या हाती लागली आहे. मुळात अपघात केला नव्हता तर सलमानने तेथे जमलेल्या जमावाला तसे सांगायला हवे होते. तसेच घटनास्थळी पोलीस येईपर्यंत त्याने तेथे थांबायला हवे होते. पण तो पळाला. पळण्याचे कारणच काय होते? एवढेच काय तर आपण काही गैर केले नसल्याचा सलमानचा दावा होता, मग त्याने घटना घडल्यानंतर थेट पोलीस ठाणे गाठून अपघाताची तक्रार करायला हवी होती. त्याने तसेही केले नाही. असे ताशेरे न्यायालयाने ओढले आहेत.
गाडीचा टायर फुटल्याने अपघात झाल्याचे सलमानचे म्हणणे साफ खोटे आहे. आपण गाडी भरधाव वेगाने चालवत नव्हतो, असा दावा स्वत: सलमाननेच केला आहे; आणि गाडी भरधाव वेगात नसेल तर टायर फुटणे अशक्य आहे, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले आहे.
महत्त्वाचे म्हणजे १३ वर्षांनंतर अशोक सिंगने न्यायालयात येऊन सांगितले की, मी गाडी चालवत होतो आणि सलमानचे वडील सलीम खान यांच्या सांगण्यावरून मी हे आता न्यायालयाला सांगतो आहे, अशी पुष्टीही सिंगने जोडली. मात्र स्वत:च्या मुलाला पुढे करून खऱ्या आरोपीला पाठीशी घालण्याचे काम सलीम खान यांनी खरेच केले असावे, याबाबत शंका वाटते. तसेच ड्रायव्हरला वाचवणे सलमानलाही मान्य असावे हे विश्वासार्ह नाही. कारण अपघात झाल्यापासून सिंग हा सलमानच्या घरातच काम करतो आहे. अशा परिस्थितीत सिंग गाडी चालवत होता, हे १३ वर्षांत समोर न येणे अशक्य आहे, असे मतही न्यायालयाने नोंदवले आहे.
विशेष म्हणजे अपघातात एकाचा बळी गेला आहे ही बाब मला नंतर कळाली, असा दावा सलमानने केला. प्रत्यक्षात सिंग गाडी चालवत होता तर अपघातात एकाचे निधन झाले आहे हे सलमानला घटनास्थळीच तत्काळ कळाले असते, असे देखील न्यायालयाने निकालपत्रात नमूद केले आहे. त्यामुळे सलमान कसा खोटारडा आहे स्पष्ट झाले आहे.सलमानचा गुन्हा सिद्ध होणे कठीण बाब होती. कारण यातील मुख्य साक्षीदार, त्याचा सुरक्षा रक्षक व पोलीस हवालदार रवींद्र पाटील याचे हा खटला सुरू असतानाच निधन झाले. मात्र न्यायालयाने पाटील याची साक्ष नि:संदेह खरी असल्याचा निर्वाळा दिला .

Web Title: Salman Khotarada, left without help to the injured!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.