सलीम खान यांनी सलमानला घरात कोंडून ठेवलं पाहिजे - संजय राऊत
By Admin | Updated: October 1, 2016 13:27 IST2016-10-01T13:27:32+5:302016-10-01T13:27:32+5:30
सलीम खान यांनी आपल्या मुलाला घरात कोंडून ठेवावं कारण तो काहीही बोलत असतो, अशी उपरोधक टीका शिवसेना नेते संजय राऊत यांनी केली आहे

सलीम खान यांनी सलमानला घरात कोंडून ठेवलं पाहिजे - संजय राऊत
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 1 - पाकिस्तानी कलाकारांची बाजू घेणा-या सलमान खानवर सर्व स्तरातून टीका होत असताना शिवसेना नेते संजय राऊत यांनीदेखील सलमान खानचा समाचार घेत हल्ला चढवला आहे. सलीम खान यांनी आपल्या मुलाला घरात कोंडून ठेवावं कारण तो काहीही बोलत असतो, अशी उपरोधक टीका शिवसेना नेते संजय राऊत यांनी केली आहे.
'देशावर जेव्हा असं काही संकट येतं तेव्हा सलीन खान यांनी आपला मुलगा सलमान खानला घरात कोंडून ठेवावं, तो काहीह बोलत असतो. सलमान खान असो किंवा अन्य कुणी त्यांच्या घरातील कुणीही देशासाठी शहीद झालेलं नाही, त्यामुळे त्यांना फरक पडत नाही. त्यांच्या घरावर मोर्चे काढून ही त्यांना फरक पडत नाही इतके निर्ढावलेले आहेत', असं संजय राऊत बोलले आहेत.
'पाकिस्तानी कलाकार म्हणजे काही दहशतवादी नाहीत, त्यामुळे त्यांना भारतात काम करण्यास बंदी घालणं योग्य नाही' अशा शब्दांत अभिनेता सलमान खानने पाकिस्तानी कलाकारांचे समर्थन केले होते. त्यानंतर अनेकांनी सलमानच्या भुमिकेवर नाराजी व्यक्त करत टीका केली होती.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीदेखील सलमानवर हल्ला चढवत ' सलमानला जर पाकिस्तानी कलाकारांबद्दल इतकं प्रेम वाटत असेल तर त्याने तिथलं वर्क परमिट काढावं आणि पाकिस्तानात जाऊन तिथेच काम करावं. इथे आपले जवान शहीद होत आहेत आणि या लोकांना गाणी शूट करायची आहेत' अशा शब्दांत सुनावलं आहे.