ओशिवरा कारखान्यातील एमडीची विक्री परेदशात

By Admin | Updated: July 2, 2015 03:44 IST2015-07-02T03:44:34+5:302015-07-02T03:44:34+5:30

राज्य दहशतवादविरोधी पथकाने(एटीएस) उध्वस्त केलेल्या ओशिवरातील हायप्रोफाईल सोसायटीतील कारखान्यात तयार झालेला एमडी हा घातक अमलीपदार्थ मुंबई, महाराष्ट्रासह

Sales of MD in Oshiwara factory | ओशिवरा कारखान्यातील एमडीची विक्री परेदशात

ओशिवरा कारखान्यातील एमडीची विक्री परेदशात

मुंबई : राज्य दहशतवादविरोधी पथकाने(एटीएस) उध्वस्त केलेल्या ओशिवरातील हायप्रोफाईल सोसायटीतील कारखान्यात तयार झालेला एमडी हा घातक अमलीपदार्थ मुंबई, महाराष्ट्रासह परदेशात विकला जात होता,अशी माहिती पुढे आली आहे. मध्यपूर्व व युरोपातील ड्रग माफीयांच्या संपर्कात राहून या कारखान्याचा मास्टरमार्इंड साजिद इलेक्ट्रीकवाला आॅर्डरप्रमाणे एमडी तयार करून विकत असे, अशीही माहिती एटीएसला मिळाली आहे.
मूळचा बडोद्याचा रहिवासी असलेला साजिद मुंबईसह परेदशातील ड्रग डीलरच्या संपर्कात होता. गेल्या तीन वर्षांपासून तो आॅर्डरप्रमाणे एमडी तयार करून या डीलरना विकत होता. एमडी तयार करण्यासाठी त्याने राज्याबाहेर प्रयोगशाळा तयार केली होती. मात्र ती गुंडाळून तो मुंबईत परतला होता. महिन्याभरापूर्वी त्याने ओशिवऱ्याच्या एकदंत टॉवरमध्ये थ्री बीएचके फ्लॅटमध्ये एमडीचे उत्पादन सुरू केले होते.
दोन दिवसांपूर्वी एटीएसच्या चारकोप युनिटने साजिदच्या कारखान्यावर धाड घालून १५१.५ किलो एमडी हस्तगत केले होते. या कारवाईत साजीदसोबत त्याच्या तीन साथीदारांना अटक करण्यात आली. या चौघांच्या चौकशीतून मुंबईतील काही अंमलीपदार्थांच्या छोटया मोठया तस्करांची माहिती पुढे आली आहे. मात्र पोलीलांचे मुख्य लक्ष्य दक्षिण मुंबईतील एक डीलर आहे. त्याने हल्लीच साजीदकडून मोठया प्रमाणावर एमडी विकत घेतल्याची माहिती एटीएसला मिळाली आहे.

हायप्रोफाईल ग्राहक : पश्चिम उपनगरात मोठया प्रमाणावर नाईट क्लब, पब आहेत. तसेच बॉलीवूडशी संबंधित अनेकांची निवासस्थाने पश्चिम उपनगरात आहेत. त्यांच्यापर्यंत एमडी सहजरित्या पोहोचवता यावे यासाठी साजिदने ओशिवऱ्यात कारखाना सुरू केला. दरम्यान, साजिदच्या कारखान्यात तयार झालेले एमडी विकत घेणारा ग्राहकवर्गही हायप्रोफाईल असावा, त्यात बॉलीवूडशी संबंधित काहींचा समावेश असावा असा दाट संशय एटीएसला आहे. त्यानुसार एटीएस तपास करत असल्याची माहिती मिळते.

कोडवर्ड नमक : साजिदच्या कारखान्यात तयार झालेल्या एमडीला मुंबईसह परदेशात नमक हा कोडवर्ड देण्यात आला होता.

Web Title: Sales of MD in Oshiwara factory