बांगलादेशी महिलेची विक्री
By Admin | Updated: December 26, 2014 02:19 IST2014-12-26T02:19:11+5:302014-12-26T02:19:11+5:30
बांगलादेशी महिलेस नोकरीचे आमिष दाखवून एका बांगलादेशी दलालाने शहरातील कुंटणखान्यात विकल्याचा प्रकार उघडकीस आला

बांगलादेशी महिलेची विक्री
भिवंडी : बांगलादेशी महिलेस नोकरीचे आमिष दाखवून एका बांगलादेशी दलालाने शहरातील कुंटणखान्यात विकल्याचा प्रकार उघडकीस आला असून या महिलेस वेश्यागमनास भाग पाडणाऱ्या कुंटणखाना मालकीण व दलालास पोलिसांनी अटक केली आहे.
बांगलादेशातील तरुण महिलांना नोकरीचे आमिष दाखवून त्यांना भारतात आणणाऱ्या वाहीदूल शेख याने त्याच मुलीकडून ३५ हजार रुपये घेतले. तिला भिवंडीत आणून येथील कुंटणखान्यातील दलाल मोहम्मद अब्दुल याच्या मध्यस्थीने कुंटणखाना मालकीण रुखसाना हिला विकले. गेल्या १५ दिवसांपासून रुखसाना ही जबरदस्तीने पीडित महिलेस एका खोलीत कोंडून तिला वेश्या व्यवसाय करण्यास भाग पाडत होती. ही घटना शहर पोलिसांना कळताच त्यांनी कल्याण रोड ते खदान रोड दरम्यानच्या प्रेमनगर येथे धाड टाकून पीडित मुलीची सुटका केली. या प्रकरणी कुंटणखाना मालकीण रुखसाना बिबी हिनाईत खान (३०) व दलाल मोहम्मद अब्दुल कयुम खान (२८) या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. मात्र, मूळ बांगलादेशी दलाल फरार झाला आहे. (प्रतिनिधी)