लावणीवर थिरकल्या ‘सखी’
By Admin | Updated: February 2, 2015 00:49 IST2015-02-02T00:47:51+5:302015-02-02T00:49:41+5:30
शिट्ट्या-टाळ्याचा जल्लोष : चैत्राली राजेंच्या अदाकारीने ‘सखीं’ची लावण्यमय संध्याकाळ; अलोट गर्दी

लावणीवर थिरकल्या ‘सखी’
कोल्हापूर : ढोलकीची थाप... घुंगरांचा नाद, टिपेचे सूर आणि आपल्या नटखट अदाकारीने आणि नृत्याच्या बिजलीने घायाळ करणाऱ्या लावण्यवती अप्सरा... लावणीच्या प्रत्येक सादरीकरणाला शिट्ट्या, टाळ्या आणि संगतीने ‘कोल्हापुरी स्टाईल’ने नृत्य करून मनमुराद आनंद लुटणाऱ्या ‘सखीं’नी आज, रविवारी मार्केट यार्ड येथील शाहू सांस्कृतिक कलामंदिर दणाणून सोडले. तोंडाने शिट्टी वाजवीत आणि फेटे उडवण्याची हौस रुमालाने भरून काढत सखींनी ‘लावणी शो’चा आनंद द्विगुणीत केला. या कार्यक्रमाला तुफान गर्दी होती.लोकमत ‘सखी मंच’च्यावतीने लावणीसम्राज्ञी चैत्राली राजे यांच्या संचाचा ‘चैत्रालीचा नाद करायचा नाय...’ (चैत्रालीचा लावणी महोत्सव) या खास लोकमत सखींसाठी आयोजित लावणी कार्यक्रमाची सुरुवात ‘लोकमत’चे संस्थापक स्वर्गीय जवाहरलालजी दर्डा यांच्या प्रतिमापूजनाने झाली. ‘तूच सुखकर्ता’ नृत्याने ‘लावणी शो’ला सुरुवात झाली. या गीतानंतर चैत्राली राजे यांनी सादर केलेल्या ‘या रावजी, बसा भावजी...’ या बैठ्या लावणीने या कार्यक्रमाला चार चॉँद लावले. संचातील नृत्यांगनांनी सादर केलेल्या ‘गर्र भिंगरी ग भिंगरी...’, ‘बुगडी माझी सांडली गं जाता साताऱ्याला...’, ‘नाकी डोळी छान,’ ‘कुणीतरी न्यावं मला फिरवायाला...’ या नृत्यांनंतर राजे यांनी ‘गर गर गर भिंगरी गं भिंगरी...’ अशा एकापेक्षा एक ठेका धरायला लावणींवर लावण्यवतींनी सादर केलेल्या दिलखेचक अदाकारीने सखींनाही काही काळ वेड लावले. त्यामुळे त्यांनी एकच जल्लोष केला.
अवघ्या महाराष्ट्राला ‘कारभारी दमानं होऊ द्या दमानं,’ ‘नाद खुळा,’ ‘पाडाला पिकलाय आंबा ’ या गाजलेल्या गीतांवर दिलखेचक नृत्य करीत नृत्यांगनांनी सखींनाही त्यांच्या तालावर थिरकायला लावले. उत्तरोत्तर रंगत गेलेल्या या कार्यक्रमात प्रत्येक नृत्याविष्कारावर सखीही अगदी रममाण होऊन गेल्या होत्या.
दर्दी रसिक असला की कलाकाराची कलाही खुलत जाते. त्याचप्रमाणे तब्बल दोन तासांचे दोन प्रयोग आज, रविवारी शाहू सांस्कृतिक मंदिर येथे आयोजित केले होते. अधिक काळ तळपणाऱ्या या नृत्यबिजलीवर थिरकण्याचा आनंद सखींनीही लुटला. टाळ्या, शिट्ट्या आणि ‘वन्स मोअर’ची दाद देत सखींनी या बहारदार कार्यक्रमाचा आस्वाद घेतला.
उच्चांकी गर्दी
अॅप, पॉपच्या जमान्यातही आजही लावणीची जादू अबाधित आहे, याची प्रचिती देत तीन हजारांहून अधिक सखींनी या कार्यक्रमाला हजेरी लावली. काही सखींनी स्टेजवर जाऊन तोंडात शिट्ट्या वाजवल्या, तर काही सखींनी खेळण्यातील शिट्ट्या वाजवत स्कार्फ हवेत उडवीत, हात उंचावून टाळ्या वाजविल्या. लावण्यवतींचा साद आणि सखींचा प्रतिसाद अशा अभूतपूर्व गर्दीने हा कार्यक्रम रंगला.
लोकमत ‘सखी मंच’तर्फे रविवारी शाहू सांस्कृतिक मंदिर येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘चैत्रालीचा नाद करायचा नाय...’ लावणी शोमध्ये मुख्य नृत्यांगना चैत्राली राजेंची अदाकारी. दुसऱ्या छायाचित्रात कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या सखी सदस्या.