केंद्र शासनावर संतांची नाराजी

By Admin | Updated: December 29, 2016 20:08 IST2016-12-29T20:08:51+5:302016-12-29T20:08:51+5:30

देशात सत्ताबदल झाल्यानंतर गोरक्षा, राममंदिराबाबत सकारात्मक पावले उचलण्यात येतील

Saints angry over the central government | केंद्र शासनावर संतांची नाराजी

केंद्र शासनावर संतांची नाराजी

ऑनलाइन लोकमत

नागपूर, दि. 29 - देशात सत्ताबदल झाल्यानंतर गोरक्षा, राममंदिराबाबत सकारात्मक पावले उचलण्यात येतील, अशी अपेक्षा होती. मात्र याबाबतीत कुठलेही अनुकूल वातावरण दिसून येत नाही. देशात अच्छे दिन आल्याचा दावा करण्यात येत आहे. मात्र प्रत्यक्षात त्याची अनुभूती कुठेही येत नाही, या शब्दांत स्वामी मंगलगिरी आश्रमचे स्वामी गोविंदगिरी महाराज यांनी केंद्र शासनावर टीकास्त्र सोडले आहे. विशेष म्हणजे विश्व हिंदू परिषदेच्या मंचावरुन त्यांनी या भावना व्यक्त केल्या.
गुरुवारपासून नागपुरातील मॉं उमिया धाम येथे विहिंपच्या केंद्रीय व्यवस्थापन समिती व प्रतिनिधी मंडळाच्या संयुक्त अधिवेशनाला सुरुवात झाली. उद्घाटन सत्राला उपस्थित अडीचशेहून अधिक प्रतिनिधींना मार्गदर्शन करताना गोविंदगिरी महाराजांनी केंद्राच्या धोरणांवर असमाधानी असल्याचे सांगितले. गोरक्षा व राममंदिराबाबत सकारात्मक पावले उचलण्यात आलेली नाही. आपल्या विचारांचे शासन सत्तेत आल्यावर बऱ्याच समस्या दूर होतील, असे वाटत होते. परंतु असे पूर्णपणे झालेले नाही. संस्कृतसारखी देशाची भाषा दुर्लक्षितच आहे, असे ते म्हणाले. यावेळी संघ परिवारातील समन्वयावरदेखील भाष्य केले. विहिंपकडून हिंदू समाजाला एकत्र बांधण्याचे काम सुरू आहे. दुसरीकडे संघाकडूनदेखील धर्मजागरण विभागाच्या माध्यमातून काम सुरू आहे. अशा स्थितीत लोकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. त्यामुळे समन्वयावर जास्तीत जास्त भर देण्याची गरज असल्याचे ते म्हणाले. याप्रसंगी विहिंपचे आंतरराष्ट्रीय कार्याध्यक्ष डॉ.प्रवीण तोगडिया, राष्ट्रीय अध्यक्ष राघव रेड्डी, महामंत्री चंपत राय, विदेश विभागाचे कार्याध्यक्ष अशोक चौगुले, जितेंद्रनाथ महाराज प्रामुख्याने उपस्थित होते.

विहिंपने तयार केला देशव्यापी हिंदू सुरक्षा कृती आराखडा
देशातील अनेक ठिकाणी हिंदू समाजावरील हल्ले वाढले आहे. हिंदू समाज या देशातच असुरक्षित असल्याचे दिसून येत असून त्यांच्या सुरक्षेसाठी विहिंपतर्फे देशव्यापी हिंदू सुरक्षा कृती आराखडा तयार करण्यात आल्याचे डॉ. प्रवीण तोगडिया यांनी सांगितले. अयोध्येत राममंदिराची निर्मिती व्हावी यासाठी चतुसूत्री तयार करण्यात आली आहे. राम मंदिराची निर्मिती ही ठरलेल्या प्रारुपानुसार रामजन्मभूमी न्यासाकडूनच होईल. तसेच मंदिराची एक इंच जागाही कुणाला देणार नाही. आहे त्याच जागेवर मंदिर तयार करण्यात येईल. यासंदर्भात संसदेत कायदादेखील बनविण्यात यावा, अशी मागणी यावेळी तोगडिया यांनी केली.

आंदोलनाचा मार्ग मोकळा
गो हत्येच्या प्रकरणांवर तोगडिया यांनी नाराजी व्यक्त केली. गोहत्या बंदीची अंमलबजावणी प्रभावी पद्धतीने होण्याची आवश्यकता आहे. जर कुणी आमचे ऐकणारच नसेल तर आंदोलनाचा मार्ग मोकळा आहे, या शब्दांत त्यांनी केंद्र शासनाला इशाराच दिला.

Web Title: Saints angry over the central government