साईबाबाला वैद्यकीय जामीन मंजूर
By Admin | Updated: July 1, 2015 01:36 IST2015-07-01T01:36:20+5:302015-07-01T01:36:20+5:30
नक्षलवादी चळवळीशी संबंधित असल्याच्या संशयावरून अटकेत असलेला दिल्ली विद्यापीठाचा प्राध्यापक जी.एन. साईबाबा याला वैद्यकीय उपचारांची गरज आहे

साईबाबाला वैद्यकीय जामीन मंजूर
मुंबई : नक्षलवादी चळवळीशी संबंधित असल्याच्या संशयावरून अटकेत असलेला दिल्ली विद्यापीठाचा प्राध्यापक जी.एन. साईबाबा याला वैद्यकीय उपचारांची गरज आहे आणि ते लगेच न मिळाल्यास त्याच्या आरोग्यास धोका संभवू शकतो याची खात्री पटल्याने मुंबई उच्च न्यायालयाने मंगळवारी साईबाबाला ५० हजार रुपयांचा जामीन मंजूर केला.
मुख्य न्यायाधीश न्या. मोहित शहा आणि न्या. एस.बी. शुक्रे यांच्या खंडपीठाने हा जामीन मंजूर करताना साईबाबाने जामिनावर असताना पुराव्यांमध्ये ढवळाढवळ करू नये व उपचार घेणार असलेल्या ठिकाणाचा पत्ता पोलिसांना द्यावा, अशा अटी घातल्या. नक्षलवादी चळवळीशी संबंध असल्याच्या आरोपावरून गेल्या वर्षी अटक केला गेलेला साईबाबा सध्या नागपूर कारागृहात आहे. मात्र त्यांची प्रकृती ढासळत असून, त्याला वैद्यकीय उपचारांची आवश्यकता आहे, असे वृत्त एका दैनिकाने प्रसारित केले होते. सामाजिक कार्यकर्त्या पौर्णिमा उपाध्याय यांनीही यासाठी न्यायालयाला पत्र लिहिले. याची दखल घेत न्यायालयाने हे प्रकरण सुमोटो याचिका म्हणून सुनावणीसाठी दाखल करून घेतले होते. खंडपीठाने साईबाबाचा वैद्यकीय अहवालही मागवला. त्यात त्यांना उपचाराची आवश्यकता असल्याचे नमूद करण्यात आले होते. मात्र सरकारी वकील संदीप शिंदे यांनी याला विरोध केला. परंतु साईबाबा आरोपी असला तरी तो आजारी आहे. वैद्यकीय उपचार मिळणे हा कैद्याचाही मूलभूत अधिकार आहे, असे न्यायालयाने नमूद केले.