पुणे : साहित्यवर्तुळाचे लक्ष लागलेल्या महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या (मसाप) पंचवार्षिक निवडणुकीत परिवर्तन पॅनलने बाजी मारली. परिषदेवर ‘परिवर्तन’ने वर्चस्व मिळवित महत्त्वाच्या तीन प्रमुख पदांवर नाव कोरले. कार्याध्यक्षपदी प्रा. मिलिंद जोशी, प्रमुख कार्यवाहपदी प्रकाश पायगुडे आणि कोषाध्यक्षपदी सुनीताराजे पवार यांची निवड झाली. ‘मसाप’च्या या तीन प्रमुख पदांसाठी दुहेरी लढत चांगलीच रंगली. जोशी यांना ४,२६३ तर राजीव बर्वे ( नवनिर्माण) यांना २,४७९ मते पडली. जोशी यांनी तब्बल १,७८४ मतांची आघाडी घेत विजय मिळविला. प्रकाश पायगुडे यांना ४,१२१ आणि सुनील महाजन यांना २,५१३ तसेच सुनीता राजे पवार यांना ३,९३३ व योगेश सोमण यांना २,७२० मते पडली. विद्यमान प्रमुख कार्यवाह पायगुडे यांनी आपले पद कायम राखले. विद्यमान कोषाध्यक्ष सुनील महाजन यांचा पराभव झाला.सातारा, सोलापूर, कोल्हापूर आणि कोकण विभागांवरही परिवर्तन पॅनलने वर्चस्व सिद्ध केले. २१ जागांसाठी ४८ उमेदवार रिंगणात उतरले होते. काही फेऱ्यांमध्ये नवनिर्माण पॅनेल आघाडीवर असल्याचे सांगितले जात होते. मात्र अचानक ‘परिवर्तन’ घडले. शहर प्रतिनिधींमध्ये दीपक करंदीकर ( स्थानिक कार्यवाह १), बंडा जोशी ( कार्यवाह २), उद्धव कानडे ( कार्यवाह ३) आणि प्रमोद आडकर ( कार्यवाह ६) विजयी ठरले तर साधारण प्रतिनिधीच्या तीन जागांवर शिरीष चिटणीस, सतीश देसाई आणि अरविंद संगमनेरकर यांची निवड झाली. जिल्ह्याच्या तीन जागा पुरूषोत्तम काळे, रावसाहेब पवार आणि राजन लाखे यांनी पटकाविल्या. (प्रतिनिधी)
साहित्य परिषदेत ‘परिवर्तन’!
By admin | Updated: March 16, 2016 08:36 IST