साहेब, बदली करता का बदली
By Admin | Updated: August 28, 2014 03:22 IST2014-08-28T03:22:46+5:302014-08-28T03:22:46+5:30
आपल्या जवळचा कार्यकर्ता आहे साहेब... निवडणुकीत कामाला येईल... अशी आर्जवे करीत मंत्रालय आणि जवळपासच्या बंगल्यांवर राज्यभरातून आलेल्या अधिकाऱ्यांची तुफान गर्दी उसळली आहे.

साहेब, बदली करता का बदली
अतुल कुलकर्णी, मुंबई
साहेब, एवढी एक तरी बदली करा ना... आपल्या जवळचा कार्यकर्ता आहे साहेब... निवडणुकीत कामाला येईल... अशी आर्जवे करीत मंत्रालय आणि जवळपासच्या बंगल्यांवर राज्यभरातून आलेल्या अधिकाऱ्यांची तुफान गर्दी उसळली आहे. विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता कधीही लागू शकते, हे लक्षात घेऊन प्रत्येक मंत्र्याकडे शेवटच्या क्षणापर्यंत आपली फाइल मंजूर करून घेण्यासाठी सगळे जण या विभागातून त्या विभागात अक्षरश: पळत सुटल्याचे चित्र आज दिवसभर होते.
एक आमदार तावातावाने गृह विभागातील एका अधिकाऱ्याशी हुज्जत घालत होता. किती दिवस लावणार आहात, फाइल अजून का मंजूर झाली नाही, कुठे अडकलीय आमची फाईल... त्यावर शांतपणे तो अधिकारी सांगत होता, की साहेब, तुमची फाइल गृह विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवांकडून आली की लगेचच सही घेऊन देतो. त्यावर तो आमदार तावातावाने म्हणाला, मंत्र्यांनी सांगून देखील सचिव ऐकत नाहीत का? मंत्री मोठे आहेत की सचिव? समोरचा अधिकारी निरुत्तर होता.
दुसरे दृश्य राष्ट्रवादी भवनातले. तेथे इच्छुकांच्या मुलाखती सुरू होत्या. तेथे असणारे मंत्री काही कारणासाठी थोडावेळ जरी बाहेर आले तरी लगेचच अधिकारी, कार्यकर्ते त्यांना गाठून साहेब, आमच्या बदलीचं तेवढं सांगा... फार कामाचा माणूस आहे साहेब तो... अशी गळ घालताना दिसत होते. प्रत्येक विभागात आमदार, नेते, कार्यकर्ते बदलीसाठी फिरतानाचे चित्र मंत्रालय परिसरात आहे. याशिवाय कोणाला आपल्या मतदारसंघातील कामासाठी मंजूर झालेला निधी हवा आहे, तर कोणाला निधी मिळाला तरी अधिकारी फाइलच पुढे पाठवत नाहीत, अशाही तक्रारी होत्या. एका अधिकाऱ्याकडील दृश्य बोलके होते. एक कार्यकर्ता कम नेता त्या अधिकाऱ्याकडे आला. म्हणाला, साहेब, माझ्यासोबत गावाकडचा एक अधिकारी आला आहे. त्याला बोलवा. मी त्याच्या कामाबद्दल पाठपुरावा करतोय, लवकरच करतो असे त्याला सांगा म्हणजे मी जायला मोकळा. एकदा का आचारसंहिता लागली की मग त्याचे काही का होईना... त्याही अधिकाऱ्याने या कार्यकर्त्याची मागणी तत्काळ पूर्ण करून टाकली. दोघेही खुशीत निघून गेले.