सहारिया आज निवृत्त होणार
By Admin | Updated: July 31, 2014 04:38 IST2014-07-31T04:38:24+5:302014-07-31T04:38:24+5:30
राज्याचे मुख्य सचिव जे. एस. सहारिया गुरुवारी सेवानिवृत्त होत आहेत.
सहारिया आज निवृत्त होणार
मुंबई : राज्याचे मुख्य सचिव जे. एस. सहारिया गुरुवारी सेवानिवृत्त होत आहेत. त्यांच्या जागी राज्याचे अतिरिक्त मुख्य सचिव (गृह) अमिताभ राजन किंवा अतिरिक्त मुख्य सचिव (महसूल) स्वाधीन क्षत्रिय यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे.
सहारिया यांना राज्य शासनाने मुदतवाढ दिलेली नाही. या आधी जॉनी जोसेफ, प्रेमकुमार आणि जयंतकुमार बांठिया या तीनच मुख्य सचिवांना मुदतवाढ मिळालेली होती. सहारिया यांनी आता राज्याच्या निवडणूक आयुक्त पदासाठी अर्ज केला आहे. आधीच्या आयुक्त नीला सत्यनारायण यांचा कार्यकाळ अलीकडेच संपला.
अमिताभ राजन हे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या जवळचे मानले जातात. म्हणूनच सहारियांऐवजी आपली नियुक्ती होईल, असा विश्वास त्यांना होता. तथापि, त्यांच्या पदरी निराशा आली होती. तो अन्याय या वेळी मुख्यमंत्री दूर करतील, असे म्हटले जात आहे. ज्येष्ठतेच्या निकषातही ते बसतात. ते १९७९ च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. क्षत्रिय हे १९८० च्या बॅचचे आहेत. अमिताभ राजन यांची वर्णी लागली तर त्यांना पाच महिने मुख्य सचिवपद मिळेल. येत्या ३१ डिसेंबर रोजी ते निवृत्त होतील. त्यांच्याऐवजी क्षत्रिय यांना संधी मिळाली तर सर्वाधिक काळ मुख्य सचिवपदी राहिलेल्यांमध्ये त्यांची गणना होईल. ते जानेवारी २०१७ मध्ये निवृत्त होणार आहेत. आता मुख्य सचिव झाले तर ते जवळपास ३० महिने मुख्य सचिव असतील. डिसेंबरमध्ये झाले तर २५ महिने मुख्य सचिव असतील. निवडणूक आयुक्तपदासाठी सहारिया यांच्याबरोबरच परिवहन विभागाचे प्रधान सचिव शैलेंद्रकुमार शर्मा, माजी सनदी अधिकारी टी. सी. बेंजामिन आणि चांद गोयल हेही इच्छुक
आहेत. (विशेष प्रतिनिधी)