संत गजानन महाराज पालखीचे पंढरपुरकडे प्रस्थान
By Admin | Updated: June 24, 2015 01:37 IST2015-06-24T01:37:33+5:302015-06-24T01:37:33+5:30
श्रींच्या पालखीचे ४८ वे वर्ष; पायदळ वारीत सहाशे वारकरी.

संत गजानन महाराज पालखीचे पंढरपुरकडे प्रस्थान
गजानन कलोरे/ शेगाव (जि. बुलडाणा) : सहाशेच्यावर वारकरी, गज, अश्व, टाळ मृदंग आणि हरीनामाच्या गजरात मंगळवार २३ जून रोजी संत श्री गजानन महाराजांच्या पालखीचे श्रीक्षेत्र पंढरपूरकरीता प्रस्थान झाले. पंढरपुर वारीचे हे ४८ वे वर्ष आहे. सुशोभित राजसिंहासनावर ह्यश्रीह्ण चा रजत मुखवटा ब्रम्हवृंदाच्या मंत्रोच्चारात विराजमान झाल्यानंतर संस्थानचे व्यवस्थापकीय विश्वस्त कर्मयोगी शिवशंकरभाऊ पाटील यांच्या हस्ते पूजा करण्यात आली. तद्नंतर संस्थानचे कार्यकारी विश्वस्त निळकंठदादा पाटील यांनी पुजा केली. तसेच अध्यक्ष डॉ. रमेशचंद्र डांगरा, विश्वस्त नारायणराव पाटील, गोविंदराव कलोरे, किशोरबाबू टांक, पंकज शितूत, विश्वेश्वर त्रिकाळ, अशोकराव देशमुख, अग्रवाल यांनी सुध्दा श्रींच्या चरणी श्रध्दा अर्पीत केली. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी। करकरावरि ठेवूनिया। नाम विठोबाचे घ्यावे। पाऊल पुढे पुढे टाकावे। पंढरीशी जावे आस्थांनो संसारा। वाट पाहे उभा विठ्ठलहरि अशा एकाहून एक सरस अमृतवाणीने यावेळी संपूर्ण परिसर भक्तीमय झाला होता. या प्रस्थान सोहळ्याला रमेशचंद्र गट्टाणी, शरद शिंदे, शेगोकार, गोकुलदासजी चांडक, चंदुलाल अग्रवाल, तहसिलदार गणेश पवार, सौ. पवार आदि मान्यवर उपस्थित होते. स्वागत सोहळा श्रीचे प्रगटस्थळ येथे झाला. श्रींच्या पालखी समवेत वारकर्यांना मधुकर घाटोळ, एम. पी. पाटील, रामुलाल सलामपुरीया यांच्याकडून फराळ व नागझरीरोड लगत अशोकराव देशमुख यांच्यावतीने चहापान देण्यात आले. संत नगरीतून निघालेल्या पालखीचे पहीले स्वागत श्रीक्षेत्र नागझरी येथे श्री गोमाजी महाराज संस्थानच्यावतीने धनंजय पाटील यांनी केले. यावेळी संस्थानतर्फे वारकर्यांना महाप्रसाद देण्यात आला. श्रींची पालखी दुपारचा मुक्काम आटोपून रात्रीच्या मुक्कामाला पारसकडे मार्गस्थ झाली.