‘राणेंच्या पराभवासाठी स्वपक्षातील लोक पुरेसे’
By Admin | Updated: April 8, 2015 02:12 IST2015-04-08T02:12:35+5:302015-04-08T02:12:35+5:30
नारायण राणेंच्या पराभवासाठी मला काही करायची गरज नाही. त्यासाठी त्यांच्या लोक पुरसे आहेत. त्यामुळे त्यांचा पराभव निश्चित आहे,

‘राणेंच्या पराभवासाठी स्वपक्षातील लोक पुरेसे’
मुंबई : नारायण राणेंच्या पराभवासाठी मला काही करायची गरज नाही. त्यासाठी त्यांच्या लोक पुरसे आहेत. त्यामुळे त्यांचा पराभव निश्चित आहे, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राणेंवर पलटवार केला. वांद्रे शासकीय वसाहतीतील मैदानावर शिवसेना उमेदवार तृप्ती सावंत यांच्या प्रचार सभेत मुख्यमंत्री बोलत होते.
यावेळी मुख्यमंत्री म्हणाले की, तासगावच्या पोटनिवडणुकीत आम्ही उमेदवार दिला नाही. त्याच पध्दतीने वांद्रे पूर्वमध्ये काँग्रेस आघाडीने उमेदवार उभा करायला नको होता. पण, त्यांच्यात आमच्यासारखे सौजन्य नाही. दिवंगत बाळा सावंत खरे लोकप्रतिनिधी होते. २४ तास लोकांची सेवा करणारे आमदार होते. हा त्यांचा आणि बाळासाहेब ठाकरे यांचा मतदारसंघ आहे. हे लक्षात ठेऊन मतदान करा, असे आवाहन फडणवीस यांनी केले.
छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक असो वा इंदू मिल येथील बाबासाहेब आंबेडकरांचे स्मारक, १५ वर्षांत या स्मारकासाठी एकाही गोष्टीची परवानगी आघाडी सरकारने मिळवली नाही. युती सरकारने सत्तेत येताच केंद्र सरकारकडून सर्व परवानग्या मिळविल्या.
मागच्या सरकारने या दोन्ही स्मारकावरून फक्त राजकारण करत महापुरुषांच्या नावावर फक्त मते मागितल्याचा आरोपही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केला. इतके दिवस यांना वांदे्र वसाहतीतील कर्मचा-यांना मालकी हक्काने घरे देण्याची आठवण झाली नाही. सत्तेत नसताना केले नाही, ते आता कसे करणार, असा सवालही मुख्यमंत्र्यांनी केला. सरकारी कर्मचा-यांच्या घरांचा प्रश्न सोडविण्यासाठी महिनाभरात योजना सादर करु, असेही ते यावेळी म्हणाले. (प्रतिनिधी)