साडुचा खून करून मुतदेह कचऱ्यात जाळणारे अटकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2016 17:52 IST2016-08-23T17:52:51+5:302016-08-23T17:52:51+5:30
व्यवसायासाठी हात उसने घेतलेले चार लाख परत द्यायला लागू नयेत याकरिता तगादा लावणाऱ्या साडूचा गळा आवळून खून करीत त्याचा मृतदेह कचऱ्यात लपवून नंतर जाळून टाकण्यात आला.

साडुचा खून करून मुतदेह कचऱ्यात जाळणारे अटकेत
ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. २३ : व्यवसायासाठी हात उसने घेतलेले चार लाख परत द्यायला लागू नयेत याकरिता तगादा लावणाऱ्या साडूचा गळा आवळून खून करीत त्याचा मृतदेह कचऱ्यात लपवून नंतर जाळून टाकण्यात आला. याप्रकरणी गुन्हे शाखेच्या पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.
गणेश पांडुरंग पोटे ( वय 37, रा. धनगर वाडा, साखळी पीर तालमीजवळ, नाना पेठ) असे खून झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी अशोक मोहन गुणगे (वय 32, रा. डोके तालीम मागे, नाना पेठ) आणि कुमार तोरगल (रा. 14, नाना पेठ) यांना अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी समर्थ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुन्हे शाखेचे उपायुक्त पी. आर. पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, पोटे आणि गुणगे व तोरगल तिघेही साडू आहेत. पोटे यांचा मृतदेह अर्धवट जळालेल्या अवस्थेत अल्पना टॉकीज जवळील मच्छि मार्केट येथील कचरा पेटीमध्ये आढळून आला होता. शवविच्छेदनामध्ये पोटे यांचा मृत्यू गळा दाबून तसेच मारहाण करून जाळण्यात आल्याचे निष्पन्न झाले होते.
पोलिसांनी तपासाला सुरुवात केली असता हा गुन्हा साडू गुणगे याने केला असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली होती. त्यानुसार गुणगे याला अटक करण्यात आली.
गुणगे याने पोटे यांच्याकडून चार लाख रुपये व्यवसायासाठी हात उसने घेतले होते. हे पैसे गुणगे याने मौजमजेमध्ये उडवले होते. या पैसांसाठी पोटे तगादा लावत होते. त्यासाठी पोटे यांचे कुटुंबीय गावी गेले असताना त्यांना दारू पाजली. त्यांचा दोघांनीं शनिवारी रात्री गळा आवळून खून केल्यावर मृतदेह कचरा पेटीत दडवून ठेवला. रविवारी रात्री गुणगे याने परत तेथे जाऊन कचरा पेटवून मृतदेह जाळून टाकला होता. हि घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली होती.