सदाशिव गोरक्षकर यांना जीवनगौरव पुरस्कार जाहीर
By Admin | Updated: August 26, 2016 02:00 IST2016-08-26T02:00:03+5:302016-08-26T02:00:03+5:30
ज्येष्ठ वस्तुसंग्रहालयतज्ज्ञ आणि छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयाचे माजी संचालक सदाशिव गोरक्षकर यांना जाहीर झाला

सदाशिव गोरक्षकर यांना जीवनगौरव पुरस्कार जाहीर
मुंबई : चतुरंग प्रतिष्ठानचा यंदाचा ‘जीवनगौरव’ पुरस्कार ज्येष्ठ वस्तुसंग्रहालयतज्ज्ञ आणि छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयाचे माजी संचालक सदाशिव गोरक्षकर यांना जाहीर झाला आहे. तीन लाख रुपये, सन्मानचिन्ह आणि मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. येत्या डिसेंबर महिन्यात होणाऱ्या चतुरंग प्रतिष्ठानच्या रंगसंमेलनात जीवनगौरव पुरस्कार गोरक्षकर यांना प्रदान करण्यात येणार आहे.
पुरस्काराचे यंदा २६वे वर्ष असून, यंदाचा पुरस्कार ‘सांस्कृतिक’ क्षेत्रासाठी देण्यात येणार आहे. वस्तुसंग्रहालय शास्त्रासारख्या सामान्यत: उपेक्षित ज्ञानशाखेमध्ये समर्पित भावनेने, ध्यासवृत्तीने आणि काळजीपूर्वक त्यांनी दिलेल्या महत्त्वपूर्ण योगदानाची दखल घेऊन यंदाच्या पुरस्कारासाठी त्यांची निवड करण्यात आली. डॉ. विनय सहस्रबुद्धे यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीने एकमताने ही निवड केली. या समितीत विजय कुवळेकर, सुधीर जोगळेकर, डॉ. उदय
निरगुडकर, सुधीर गाडगीळ, नामदेव कांबळे, नीला सत्यनारायण यांचा समावेश होता. यापूर्वी जीवनगौरव पुरस्कार भालजी पेंढारकर, पु. ल. देशपांडे, सत्यदेव दुबे, सुधीर फडके,
बाबासाहेब पुरंदरे, डॉ. अशोक रानडे, श्री. पु. भागवत, आचार्य पार्वतीकुमार, भालचंद्र पेंढारकर, लता मंगेशकर, विजया मेहता यांना प्रदान करण्यात आला होता. (प्रतिनिधी)