सचिन पाडावेचा रेल्वे करणार गौरव
By Admin | Updated: November 12, 2014 23:31 IST2014-11-12T21:21:20+5:302014-11-12T23:31:19+5:30
बाळासाहेब निकम : तडा गेलेल्या रुळामुळे होणारा रेल्वे अपघात टाळला...

सचिन पाडावेचा रेल्वे करणार गौरव
रत्नागिरी : करबुडे बोगद्यापासून काही अंतरावर तडा गेलेल्या रूळामुळे होणारा भयानक अपघात प्रसंगाधानामुळे टळला. त्यामुळे हजारो प्रवाशांचे प्राण वाचविणाऱ्या ट्रॅकमन सचिन पाडावे यांचा कोकण रेल्वेच्या रत्नागिरी विभागाकडून येत्या दोन - तीन दिवसात सत्कार करण्यात येणार असल्याची माहिती कोकण रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक बाळासाहेब निकम यांनी दिली.
ही घटना रविवारी घडली. करबुडे बोगद्यापासून काही अंतरावर तडा गेलला रूळ पाहताच ट्रॅकमन पाडावे यांची तारांबळ उडाली. त्यानी हा संदेश रेल्वेस्थानकापर्यंत पोहोचवण्यासाठी जिवाचा आटापिटा केला. मात्र, तोपर्यंत कोकणकन्या उक्षी स्थानकातून सुटली होती. ७५ किलोमीटर तासी वेगाने धावणाऱ्या या गाडीला करबुडेच्या या तुटलेल्या रूळाच्या आधी थांबविले नाही तर अनर्थ घडेल, हजारो प्रवाशांच्या जिवाला धोका आहे, काहीतरी करायलाच हवे, एवढीच जाणीव पाडावे यांना झाली. दुसऱ्याच क्षणी कोणताही विचार न करता ते उक्षी बोगद्याच्या दिशेने धावत सुटले. त्यानी लाल सिग्नल देणारी बॅटरी कोकणकन्या एक्सप्रेसवर मारत धोक्याचा इशारा दिला. कशीतरी धडधड आवाज करीत ही एक्सप्रेस थांबली. घटना कळताच हजारो प्रवाशांनी आपण केवढ्या भयानक प्रसंगातून वाचलो, हे कळताच सुटकेचा निश्वास टाकला. कंत्राटी तत्त्वावर काम करणाऱ्या ट्रॅकमन पाडावे यानी प्रसंगावधान राखून हजारो प्रवाशांचे प्राण वाचवले. त्याच्या या उत्कृष्ट कामगिरीबद्दल कोकण रेल्वे प्रशासनाने त्यांचा सत्कार करावा, अशी मागणी होत होती. अखेर त्या मागणीचा विचार करून कोकण रेल्वेच्या रत्नागिरी विभागातर्फे त्याला गौरविण्यात येणार आहे.
कोकण रेल्वेचा ‘फाऊंडेशन डे’ १५ आॅक्टोबरला साजरा केला जातो. यावेळी उल्लेखनीय कार्य करणारे कर्मचारी, अधिकारी यांना गौरविण्यात येते. यात पाडावे यांच्या सत्काराबाबत नक्कीच विचार होईल, असे निकम यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
करबुडे बोगद्यानजीक रुळावर तडा गेल्याने होणारा रेल्वे अपघात सचिन पाडावे यांच्यामुळे टळला. याबद्दल आमदार उदय सामंत यांच्याहस्ते त्यांचा गौरव करण्यात आला.