पत्नीने शरीरसंबंध नाकारणे क्रूरता
By Admin | Updated: January 14, 2017 04:44 IST2017-01-14T04:44:32+5:302017-01-14T04:44:32+5:30
पत्नीने पतीसोबत शरीरसंबंध ठेवण्यास व एकत्र राहण्यास नकार देणे ही कृती क्रूरतेमध्ये मोडते, असे मत मुंबई उच्च न्यायालयाच्या

पत्नीने शरीरसंबंध नाकारणे क्रूरता
नागपूर : पत्नीने पतीसोबत शरीरसंबंध ठेवण्यास व एकत्र राहण्यास नकार देणे ही कृती क्रूरतेमध्ये मोडते, असे मत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने एका प्रकरणावरील निर्णयात नोंदविले आहे. पत्नी अकोला तर, पती यवतमाळ येथील रहिवासी आहे.
या प्रकरणात पत्नी पतीसोबत शरीरसंबंध ठेवण्यास नकार देत होती. तसेच, ती पतीसोबत राहण्यासही तयार नव्हती. वारंवार माहेरी जात होती. स्वत:हून सासरी परत येत नव्हती. तिला घ्यायला जावे लागत होते. ती घरकामे करण्यास टाळाटाळ करीत होती. संयुक्त कुटुंबात राहण्याची तिची तयारी नव्हती. तिला स्वतंत्र राहायचे होते. अनेकदा समजावूनही तिने आपल्या स्वभावात परिवर्तन केले नाही. त्यामुळे पतीने पत्नीच्या क्रूरतेच्या आधारावर घटस्फोट मिळण्यासाठी कुटुंब न्यायालयात याचिका दाखल केली होती. कुटुंब न्यायालयाने १४ एप्रिल २०११ रोजी याचिका मंजूर केली. याविरुद्ध पत्नीने उच्च न्यायालयात अपील केले होते. उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती वासंती नाईक व न्यायमूर्ती विनय देशपांडे यांनी वरीलप्रमाणे मत नोंदवून पत्नीची वागणूक पाहता अपील फेटाळत कुटुंब न्यायालयाचा निर्णय कायम ठेवला. (प्रतिनिधी)