फौजा मागे घेतल्याचा रशियाचा दावा, अमेरिका म्हणते पुरावा नाही
By Admin | Updated: May 8, 2014 23:11 IST2014-05-08T23:11:09+5:302014-05-08T23:11:09+5:30
रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी पाश्चात्त्य देशांसोबतच्या संघर्षात प्रथमच नमते घेत गुरुवारी युक्रेनच्या सीमेवरील सैन्य मागे घेतल्याची घोषणा केली.

फौजा मागे घेतल्याचा रशियाचा दावा, अमेरिका म्हणते पुरावा नाही
पुतीन यांचे आवाहन फेटाळले : सार्वमत घेण्यावर बंडखोर ठामच
दोनेत्सक (युक्रेन) : रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी पाश्चात्त्य देशांसोबतच्या संघर्षात प्रथमच नमते घेत गुरुवारी युक्रेनच्या सीमेवरील सैन्य मागे घेतल्याची घोषणा केली. एवढेच नाहीतर युक्रेनच्या पूर्वेकडील दोनेत्सक प्रांतात स्वायत्ततेसाठी रविवारी घेण्यात येणारे सार्वमत पुढे ढकलण्याचे आवाहनही केले; मात्र नाटो व अमेरिकेला पुतीन यांची ही घोषणा केवळ घोषणाच वाटते. सीमेवर असे कोणतेही संकेत दिसत नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे. युक्रेन मुद्यावरून पाश्चात्त्य देशांशी सुरू असलेल्या ताणतणावाच्या पार्श्वभूमीवर रशियाच्या भूमिकेत अचानक झालेल्या बदलाबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे. रशियाने सैन्य मागे घेतल्याची घोषणा केली असली तरी तसे कोणतेही संकेत दिसून येत नाहीत. नाटो आणि अमेरिकेने रशियाच्या माघारीची कोणतीही चिन्हे सीमेवर दिसत नसल्याचे म्हटले आहे. दुसरीकडे रशियन समर्थक बंडखोरही पुतीन यांच्या सार्वमत पुढे ढकलण्याच्या प्रस्तावास राजी नाहीत. स्वीस राष्ट्राध्यक्ष दिदीर बुर्खाल्टर यांच्याशी मॉस्को येथे झालेल्या चर्चेवेळी पुतीन यांनी युक्रेन सीमेवरून सैन्य मागे घेण्यात आल्याची घोषणा केली. सीमेवरून सैन्य मागे घेऊन नियमित कवायतीसाठी प्रशिक्षण तळावर पाठविल्याचा दावा त्यांनी केला. मात्र, ही प्रशिक्षण तळे युक्रेनच्या सीमेनजीकच आहेत किंवा नाही याविषयी त्यांनी कोणतीही माहिती दिली नाही. दरम्यान, रशियन संरक्षण मंत्रालयाच्या प्रवक्त्याने सैन्य मागे घेण्यावर आताच कोणतीही भूमिका मांडण्यास नकार दिला. अमेरिकी व्हाईट हाऊसच्या प्रवक्त्याने आम्हाला सैन्य मागे घेतल्याचा कोणताही ठोस पुरावा मिळाला नसल्याचे सांगितले. दुसरीकडे नाटो सैन्याच्या प्रमुखानेही रशियाकडून युक्रेनच्या सीमेवरून सैन्य मागे घेतल्याचे कोणतेही संकेत दिसून आले नसल्याचा दावा केला आहे. दरम्यान, पुतीन यांनी युक्रेनच्या पूर्व भागात रशियनसमर्थक बंडखोरांविरोधात कारवाई करू नये, अशी मागणी केली आहे. या भागात रशियन समर्थक बंडखोर आणि युक्रेन सैन्य यांच्यात झालेल्या सशस्त्र धुमश्चक्रीत ३४ जणांचा जीव गेला होता. मृतांत अधिकतर बंडखोर असल्याचा दावा युक्रेन सरकारने केला आहे. (वृत्तसंस्था)
येत्या २५ मे रोजी युक्रेनमध्ये होणार्या राष्टÑाध्यक्ष पदाच्या निवडणुकीचे समर्थन करतानाच रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी सर्व नागरिकांचे अधिकार सुरक्षित नसतील तर मतदानाने काहीही हाती लागणार नाही, असा टोलाही लगावला.
युक्रेनचे अंतरिम पंतप्रधान आर्सिनी यात्सेनयूक यांनी पुतीन यांच्या सार्वमताच्या मागणीस ‘वायफळ बडबड’ असे संबोधले आहे.