ग्रामविकासाची फुटली हंडी!
By Admin | Updated: August 26, 2016 06:54 IST2016-08-26T06:54:32+5:302016-08-26T06:54:38+5:30
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने आज राज्यात एका अनोख्या मिशनला सुरुवात झाली.

ग्रामविकासाची फुटली हंडी!
मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने आज राज्यात एका अनोख्या मिशनला सुरुवात झाली. राज्य सरकार, खासगी कंपन्यांचा सीएसआर फंड आणि एनजीओंच्या सहकार्याने पहिल्या टप्प्यात एक हजार खेड्यांचा चेहरामोहरा
बदलला जाणार आहे. गोकुळाष्टमीच्या पर्वावर मुख्यमंत्र्यांनी ग्रामविकासाची हंडी फोडली.
मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, सध्या गावांचा विकास हा शासन व सामाजिक संस्था, कॉर्पोरेट कंपन्या यांच्या स्तरावर वेगवेगळ्या माध्यमातून होत आहे. मात्र, गावांच्या शाश्वत विकासासाठी या सर्वांना एकत्रित करून विकास व्हावा, हा मिशनचा उद्देश आहे. ते जनतेवर लादले जाणार नाही. त्या-त्या गावाची आवश्यकता बघून लोकसहभागातून योजना विशिष्ट कालावधीत पूर्ण करण्यात येतील. जल, जंगल, जमीन यांच्या माध्यमातून शाश्वत विकास करून गावांमध्ये शास्त्रीय दृष्टिकोनातून जलसंधारण, कृषी क्षेत्र आणि कौशल्य विकासासाठी प्रयत्न करण्यात येतील.
अनेक दिग्गजांच्या उपस्थितीत मंत्रालयात झालेल्या आजच्या बैठकीत या मिशनची मुहूर्तमेढ रोवली गेली.
बैठकीस वित्त व नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार, शिक्षण मंत्री विनोद तावडे, आरोग्य मंत्री डॉ. दीपक सावंत, जलसंधारण मंत्री राम शिंदे, कामगार मंत्री संभाजी पाटील निलंगेकर, राज्याचे मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय आदी उपस्थित होते. (विशेष प्रतिनिधी)
>१०० गावांमध्ये विकासाचे मिशन येत्या २ आॅक्टोबरपासून (म.गांधी जयंती) सुरू होईल.
या मिशनमध्ये ३०० गावांचा विकास बिर्ला उद्योग समूह करणार आहे.
एक हजार गावांपैकी ५०० गावे ही कॉर्पोरेट कंपन्या निवडतील. ५० टक्के गावे ही कमी मानव विकास निर्देशांकाची असतील. २५ टक्के गावे ही आदिवासी असतील.
या मिशनसाठी ५० टक्के निधी राज्य सरकार देईल तर उर्वरित निधी कंपन्या देणार आहेत.
मिशनची अंमलबजावणी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील गव्हर्निंग कौन्सिल करेल.
>मुख्यमंत्र्यांनी एका बैठकीला यायचे आणि नंतर फिरकायचे नाही असे होता कामा नये, अशी भूमिका मी मांडली होती. तथापि, मिशनची दर तीन महिन्यांनी बैठक होईल आणि प्रत्येक वेळी आपण हजर राहू, असा शब्द मुख्यमंत्र्यांनी दिला. ग्रामविकासाचा स्पष्ट उद्देश, त्यात खासगी क्षेत्राचा सहभाग, या मिशनमध्ये झोकून देण्याची सरकारची मानसिकता वाखाणण्यासारखीच आहे. - आनंद महिंद्र, प्रख्यात उद्योगपती
>माझा चेहरा, माझा आवाज हे सगळे काही या मिशनसाठी देण्याची माझी तयारी असेल. त्यासाठी जनजागृती आणि लोकसंवाद साधण्याची जबाबदारी घ्यायला मला आवडेल. स्वच्छ भारतपासून व्याघ्र संवर्धनापर्यंत ज्या काही मोहिमांमध्ये मी आतापर्यंत सहभाग घेतला त्यांचा परिपाक म्हणजे हे मिशन आहे.
- अमिताभ बच्चन, प्रख्यात अभिनेते
>शहरांच्या विकासावर आतापर्यंत लक्ष दिले गेले. मात्र, या मिशनने ग्रामविकासावर भर दिला आहे. ग्रामीण जनतेचा सहभाग हा मिशनचा गाभा आहे. ग्रामीण महाराष्ट्राला समृद्धीच्या मार्गाने नेण्याचा हा मुख्यमंत्र्यांचा प्रयत्न आहे. त्यासाठी टाटा ट्रस्ट तन-मन-धनाने सहकार्य देईल.
- रतन टाटा, अध्यक्ष, टाटा ट्रस्ट.
>बच्चन-टाटा बैठकीत
महानायक अमिताभ बच्चन, टाटा ट्रस्टचे अध्यक्ष रतन टाटा, महिंद्र समुहाचे व्यवस्थापकीय संचालक आनंद महिंद्र, हिंदुस्थान लिव्हरचे संजीव मेहता, बिर्ला ग्रुपच्या राजश्री बिर्ला, जेएसडब्ल्यूचे सज्जन जिंदाल, स्टेट बँकेच्या प्रमुख अरुंधती भट्टाचार्य, व्हिडीओकॉनचे प्रमुख राजकुमार धूत, डॉ. अनिल काकोडकर, डॉ. विजय भटकर आदी बैठकीला उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव प्रवीण परदेशी यांनी या मिशनचे सादरीकरण केले.
>मंत्री खाली, पोपटराव वर
विनोद तावडे, डॉ.दीपक सावंतांसारखे
मंत्री खाली बसलेले तर हिवरे बाजारचे सरपंच पोपटराव पवार मंचावर असे चित्र मुख्यमंत्र्यांच्या पत्र परिषदेत दिसले. मुख्यमंत्री अन् सहकारी मंत्र्यांनी पवार यांना मोठेपणा देत चांगला संदेश दिला.