उत्तर प्रदेशसारखे राज्य चालवणे हे मठ चालवण्याइतके सोपे नाही - उद्धव ठाकरे
By Admin | Updated: March 21, 2017 10:32 IST2017-03-21T07:45:27+5:302017-03-21T10:32:05+5:30
महाराष्ट्रात उपमुख्यमंत्री न देण्यावरुन सामना संपादकीयमधून उद्धव ठाकरे यांनी भाजपावर टीकास्त्र सोडले आहे.

उत्तर प्रदेशसारखे राज्य चालवणे हे मठ चालवण्याइतके सोपे नाही - उद्धव ठाकरे
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 21 - महाराष्ट्रात उपमुख्यमंत्री न देण्यावरुन सामना संपादकीयमधून उद्धव ठाकरे यांनी भाजपावर टीकास्त्र सोडले आहे. 'दोन उपमुख्यमंत्र्यांची नेमणूक उत्तर प्रदेशात केली आहे. महाराष्ट्राचा प्रश्न आला तेव्हा कोणत्याही राज्यात उपमुख्यमंत्रीपद निर्माण होणार नसल्याचा धोरणात्मक निर्णय असल्याचे सांगण्यात आले. पण जम्मू-कश्मीरात भाजपने उपमुख्यमंत्रीपद स्वीकारून थेट मेहबुबा मुफ्तीशीच मांडवली केली', अशा शब्दांत उद्धव यांनी भाजपावर टीका केली आहे. एकीकडे टीका करत असतानाच दुसरीकडे त्यांनी उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदी योगी आदित्यनाथ यांची निवड केल्याबाबत कौतुक करत मुलायम सिंह यादव यांच्यावर तोफ डागली आहे. तसंच, आझम खान यांना हिंदुस्थानचे पंतप्रधान व्हावे, असे वाटत असेल तर उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदी हिंदू साधूने विराजमान होणे काय वाईट आहे! अर्थात उत्तर प्रदेशसारखे बलाढय़ राज्य चालवणे हे मठ व पीठ चालवण्याइतके सोपे नाही, असा खोचक टोलाही उद्धव यांनी भाजपाला हाणला आहे. तर दुसरीकडे,
आदित्यनाथ यांच्या नेमणुकीने राम मंदिराच्या निर्मितीस चालना मिळेल व हिंदुत्ववाद्यांना बळ मिळेल, असेही त्यांनी सामनामध्ये म्हटले आहे.
काय आहे नेमके सामना संपादकीय?
उत्तर प्रदेशमधील साधूचे राजकीय भाग्य फळफळले आहे. मात्र यावर भारतीय जनता पक्षाच्या विरोधकांनी ऊरबडवेगिरी करण्याची गरज नाही. उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदी गोरखपूर मठाचे महंत योगी आदित्यनाथ यांची निवड संपूर्ण लोकशाही मार्गाने झाली आहे. उत्तर प्रदेशच्या जनतेने मोदी यांच्या पक्षाला प्रचंड बहुमत मिळवून दिले ३२५ भाजप आमदारांच्या नेतेपदी योगी महाराजांची निवड करण्यात आली. यात कुणाच्या पोटात दुखण्याचे तसे कारण नाही. योगी हे प्रखर हिंदुत्ववादी आहेत व हिंदुत्ववादी असणे हा आता तरी गुन्हा ठरू नये. समस्त हिंदू समाजाने भारतीय जनता पक्षाला भरघोस मतदान केले. स्वतः पंतप्रधान मोदी यांनी मतांसाठी हिंदुत्वालाच आवाहन केले. त्यामुळे उत्तर प्रदेशात प्रखर हिंदुत्ववादी चेहरा मुख्यमंत्री म्हणून द्यावा लागला. नवे मुख्यमंत्री योगी महाराज हे बऱ्यापैकी शिकलेले आहेत. अगदी ऑक्सफर्ड-केंब्रिज किंवा दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठाची नसली तरी गढवाल विद्यापीठाची पदवी त्यांच्यापाशी आहे. अनेक वर्षे ते संसदीय राजकारणात आहेत. गोरखपूरमधून ते पाच वेळा लोकसभेवर निवडून गेले आहेत. ‘सक्तीची धर्मांतरे’ व ‘लव्ह जिहाद’सारख्या विषयांवर त्यांनी कडवट भूमिका घेतली. यात त्यांचे काही चुकले असे आम्हाला वाटत नाही. त्यांनी संन्यास व दीक्षा घेतली आहे. पण धर्मकारणातून ते राजकारण व राष्ट्रकारण करीत आहेत व स्वधर्माचा अभिमान बाळगणे यात गैर नाही. उत्तर प्रदेशात मुलायमसिंग यादव यांनी सतत मुसलमानी
लांगूलचालनाचेच राजकारण
केले. हे लांगूलचालन इतके पराकोटीचे होते की उत्तर प्रदेश हिंदुस्थानात आहे की पाकिस्तानात, असा प्रश्न अनेकदा पडत असे. पण उत्तर प्रदेश हिंदुस्थानातच आहे हे योगी आदित्यनाथ यांच्या निवडीने दिसून आले. ‘‘मी आता मुसलमानांसाठीच जगेन आणि मरेन’’ हे मुल्लामुलायम यांचे अखेरचे वक्तव्य हिंदू मतदारांना नवी प्रेरणाच देऊन गेले. त्यामुळे उत्तर प्रदेशातील विजयाचे श्रेय राहुल गांधी यांना देण्यापेक्षा ते मुलायम व आझम खानसारख्या हिंदूद्वेष्टय़ांना द्यावे लागेल. आझम खान यांना हिंदुस्थानचे पंतप्रधान व्हावे, असे वाटत असेल तर उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदी हिंदू साधूने विराजमान होणे काय वाईट आहे! अर्थात उत्तर प्रदेशसारखे बलाढय़ राज्य चालवणे हे मठ व पीठ चालवण्याइतके सोपे नाही. योगी महाराजांना धर्मकारणापेक्षा विकासकामांवर भर देऊन राज्य पुढे न्यावे लागेल. उमा भारती या भगव्या वस्त्रधारी संन्यासी मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्री झाल्या व त्यांनी मुख्यमंत्री कार्यालयात पूजाअर्चेसाठी मंदिर स्थापन केले. प्रशासकीय कामांपेक्षा त्यांचा जास्त वेळ जप-जापातच जाऊ लागला तेव्हा राज्य कोलमडून पडले, हा इतिहास उत्तर प्रदेशच्या नव्या मुख्यमंत्र्यांना समजून घ्यावा लागेल. मध्य प्रदेशात शिवराजसिंह चौहान यांचे राज्य टिकले आहे ते विकासाच्या राजकारणामुळे. उत्तर प्रदेशात जातीय अराजक आहे. धर्मांध शक्तींचा अतिरेक वाढला आहे व पाकिस्तानचे हात तेथे पोहोचले आहेत. कायद्याचे राज्य कोलमडले होते ते नवनिर्वाचित मुख्यमंत्र्यांना पुन्हा उभे करावे लागेल. मुख्य म्हणजे निवडणुकीपूर्वी आश्वासन दिलेल्या
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचे काय
करणार, हा खरा प्रश्न आहे. उत्तर प्रदेशात गरिबी आहेच आणि रोजगारही नाही. त्या राज्यातील भूमिपुत्रांना रोजगारात ९० टक्के प्राधान्य देण्याची घोषणा नव्या मुख्यमंत्र्यांनी केली हा शिवसेनेच्याच विचारांचा विजय आहे. अमेरिकेत प्रे. ट्रम्प व उत्तर प्रदेशात मुख्यमंत्री आदित्यनाथ भूमिपुत्रांना रोजगारात प्राधान्य देण्याची भाषा करतात तेव्हा शिवसेनेचा ५० वर्षांचा कालखंड सफल झाला असेच म्हणावे लागेल. उत्तर प्रदेशात रोजगाराच्या संधी निर्माण झाल्या तर मुंबईसारख्या शहरावरील भार हलका होईल. मुंबईतील उत्तर भारतीयांनी मोठय़ा संख्येने भाजपास मतदान केले ते त्यांना त्यांच्या गावी जाऊन सुखाने व स्वाभिमानाने जगता यावे म्हणून. योगी आदित्यनाथ महाराजांनी देशभरातील उत्तर भारतीयांच्या मनातीलच भावना बोलून दाखवली हे आता बरे झाले. आदित्यनाथ यांच्या नेमणुकीने राम मंदिराच्या निर्मितीस चालना मिळेल व हिंदुत्ववाद्यांना बळ मिळेल. पण शेवटी पोटाची आग महत्त्वाची. त्यासाठीच नव्या मुख्यमंत्र्यांना जास्त मेहनत करावी लागेल. दोन उपमुख्यमंत्र्यांची नेमणूक उत्तर प्रदेशात केली आहे. महाराष्ट्राचा प्रश्न आला तेव्हा कोणत्याही राज्यात उपमुख्यमंत्रीपद निर्माण होणार नसल्याचा धोरणात्मक निर्णय असल्याचे सांगण्यात आले. पण जम्मू-कश्मीरात भाजपने उपमुख्यमंत्रीपद स्वीकारून थेट मेहबुबा मुफ्तीशीच मांडवली केली व उत्तर प्रदेशात दोन उपमुख्यमंत्र्यांना नेमून आदित्यनाथ महाराजांना धर्मकारणासाठी मोकळे ठेवले. अर्थात हे कधीतरी व्हायलाच हवे होते. उत्तर प्रदेशच्या नव्या मुख्यमंत्र्यांना आमच्या शुभेच्छा!