धावत्या एसटी बसला आग
By Admin | Updated: June 1, 2015 01:44 IST2015-06-01T01:44:57+5:302015-06-01T01:44:57+5:30
अकोला जिल्ह्यातील घटना; प्रवासी, वाहकाच्या सतर्कतेमुळे मोठी दुर्घटना टळली.

धावत्या एसटी बसला आग
पातूर/शिर्ला (अकोला): धावत्या एसटी बसमध्ये आग लागल्याची घटना रविवारी दुपारी अकोला जिल्ह्यातील शिर्लानजीक घडली. चालकाच्या केबिनमधून धूर निघाल्यानंतर ही किरकोळ आग लागली होती. जवळपास १५ मिनिटानंतर आग विझवण्यात आली. प्रवासी व वाहकाच्या सतर्कतेमुळे मोठी दुर्घटना टळली. एमएच-४0-९७२0 क्रमांकाची एसटी बस अकोल्याकडून लोणारला जात होती. बसमध्ये ५६ प्रवासी होते. गिअर बॉक्सजवळून धूर निघत असल्याचे वाहक ए.पी. कुळे आणि प्रवाशांना दिसले. कुळे व प्रवाशांनी ही बाब चालक ए.एम. पखाले यांच्या लक्षात आणून दिली. पखाले यांनी शिर्ला फाट्यानजीक बस थांबविली. बसमधून प्रवाशांना उतरविण्यात आले. दुसर्या बसमध्ये बसून प्रवासी मार्गस्थ झाले. घटनेची माहिती मिळताच पातूर पोलीस ठाण्याचे हेड कॉन्स्टेबल संजय चव्हाण व चांदे यांनी घटनास्थळावर धाव घेऊन पंचनामा केला.
*बसमधून उतरताना तीन प्रवासी जखमी
एसटीमध्ये आग लागल्याने प्रवासी घाबरले. बसमधून उतरत असताना खानापूर येथील राहुल धाडसे या प्रवाशाच्या पायाला दुखापत झाली. त्यांना खासगी रुग्णालयात भरती करण्यात आले. तसेच एक वयोवृद्ध महिला २ वर्षाच्या मुलीला घेऊन उतरत असताना पडली. इतर प्रवाशांनी दोघींनाही उचलले. या महिलेच्या पायाला दुखापत झाली. एकूण तीन प्रवासी किरकोळ जखमी झाले.