खड्डे बुजविण्यासाठी धावपळ
By Admin | Updated: July 23, 2016 02:56 IST2016-07-23T02:56:51+5:302016-07-23T02:56:51+5:30
‘वॉक वुईथ कमिशनर’ उपक्रम शनिवारी नेरूळमधील ज्वेल आॅफ नवी मुंबई येथे होणार आहे.

खड्डे बुजविण्यासाठी धावपळ
नवी मुंबई : ‘वॉक वुईथ कमिशनर’ उपक्रम शनिवारी नेरूळमधील ज्वेल आॅफ नवी मुंबई येथे होणार आहे. यामुळे पालिका प्रशासनाने युद्धपातळीवर या परिसरातील खड्डे बुजविण्याचे काम सुरू केले आहे. गटारावरील झाकणेही बसविली असून दिवसभर विशेष साफसफाई मोहीम राबविण्यात आली.
नवी मुंबईमधील नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या समस्यांसह शहराच्या विकासाविषयी संकल्पना समजून घेण्यासाठी आयुक्त तुकाराम मुंढे यांनी हा उपक्रम सुरू केला आहे. आतापर्यंत सीबीडी, वाशी, सानपाडा, कोपरखैरणे, रबाळेमध्ये नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला आहे. नेरूळमध्ये पामबीच रोडला लागून असलेल्या ज्वेल आॅफ नवी मुंबई या वॉटर बॉडीच्या बाजूला विकसित केलेल्या जॉगिंग ट्रॅकवर आयुक्त नागरिकांशी संवाद साधणार आहेत. शुक्रवारी दिवसभर नेरूळ ते सानपाडा रोडवरील खड्डे बुजविण्याचे काम सुरू होते. तलावाच्या चारही बाजूच्या रस्त्यांवर कुठेही कचरा आढळणार नाही याची काळजी घेण्यात येत होती.
नेरूळ व सानपाडा दरम्यानच्या रोडजवळील पावसाळी पाणी वाहून नेणाऱ्या गटारावरील झाकणे मागील काही वर्षांपासून गायब झाली आहेत. यामुळे नाईलाजाने नागरिकांना रोडवरून चालावे लागते. प्रशासनाने युद्धपातळीवर सर्व झाकणे बसविली आहेत. तलावाच्या काठावर नागरिकांशी संवाद साधण्यासाठी शेड उभारण्यात आले आहे.
>प्रत्येक विभागात आयुक्तांनी यावे
‘वॉक वुईथ कमिशनर’ उपक्रमामुळे तलाव परिसर स्वच्छ झाला आहे. रोडवरील खड्डे गायब झाले असून गटारावरील झाकणे बसविल्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. आयुक्तांनी सर्व विभागांना भेट दिली तर पूर्ण शहर स्वच्छ व खड्डेमुक्त होईल, अशी प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केली आहे.