शहरातून परप्रांतीय फेरीवाल्यांचा पळ

By Admin | Updated: July 4, 2016 03:11 IST2016-07-04T03:11:31+5:302016-07-04T03:11:31+5:30

महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या धडक कारवाईमुळे रस्ते व पदपथ अडविणाऱ्या फेरीवाल्यांचे धाबे दणाणले आहे.

Runaway runners from the city | शहरातून परप्रांतीय फेरीवाल्यांचा पळ

शहरातून परप्रांतीय फेरीवाल्यांचा पळ


नवी मुंबई : महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या धडक कारवाईमुळे रस्ते व पदपथ अडविणाऱ्या फेरीवाल्यांचे धाबे दणाणले आहे. आतापर्यंत आम्हाला कोणी हटवू शकत नाही, असे उघड बोलणाऱ्या अनेक परप्रांतीय व पालिका क्षेत्राबाहेरून येथे येणाऱ्या फेरीवाल्यांनी पळ काढला आहे.
राजकीय व प्रशासकीय वरदहस्त लाभल्यामुळे नवी मुंबईमधील फेरीवाल्यांची संख्या प्रचंड वाढली होती. शहरातील सर्व प्रमुख रस्ते व पदपथ फेरीवाल्यांनी अडविले होते. वाशी सेक्टर ९, सानपाडा, नेरूळ रेल्वे स्टेशन परिसरातील पदपथ पूर्णपणे फेरीवाल्यांनी अडविले होते. तुकाराम मुंढे यांनी आयुक्तपदाचा पदभार स्वीकारताच रस्ते व पदपथांवरील अतिक्रमण तत्काळ हटविण्याचे आदेश दिले. प्रत्येक विभागात धडक मोहिमा राबवून फेरीवाल्यांचे साहित्य जप्त करण्यास सुरवात केली. फेरीवाल्यांवर कारवाई यापूर्वीही व्हायची. परंतु त्यामध्ये कारवाईपेक्षा दिखावेगिरीच जास्त होती. विभाग अधिकारी कार्यालयातील काही कर्मचारी कारवाई होणार असल्याची माहिती द्यायचे. कारवाई करणारे पथक गेले की पुन्हा जैसे थे परिस्थिती होत होती. परंतु आयुक्तांनी स्वत: लक्ष देण्यास सुरवात केल्याने सातत्यपूर्ण कारवाई सुरू झाली आहे.
महापालिकेची स्थापना झाल्यापासून सातत्याने व नि:ष्पक्षपणे कारवाई पहिल्यांदाच झाल्याने रस्ते पदपथावर अतिक्रमण करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. शहरातील फेरीवाल्यांची संख्या २५ हजारपेक्षा जास्त झाली असून यात परप्रांतीयांचा भरणा जास्त आहे. फेरीवाल्यांना नवी मुंबई हे सर्वात सुरक्षित शहर वाटू लागले होते. राजकीय पदाधिकाऱ्यांच्या व अधिकाऱ्यांच्या संगनमताने बिनधास्तपणे व्यवसाय करता येत होता. अनेक फेरीवाला संघटनांनीही फेरीवाले वाढविण्याचा व्यवसाय सुरू केला होता.
मानखुर्द, गोवंडी व इतर ठिकाणावरून नवी मुंबईमध्ये येवून अनेक जण व्यवसाय करतात. आयुक्तांच्या कारवाईमुळे परप्रांतीय फेरीवाल्यांनी शहरातून पळ काढण्यास सुरवात केली आहे. जोपर्यंत मुंढे या शहरात आहेत तोपर्यंत अनधिकृत व्यापार करता येणार नाही. यामुळे काहींनी मुंबई, ठाणे व पनवेल परिसरात व्यवसाय करण्यासाठी चाचपणी सुरू केली आहे, तर काही पुण्यात स्थलांतरित होत आहेत.
>कोपरखैरणेमधील परिस्थिती जैसे थे
महापालिकेच्या कारवाईमुळे शहरातील रस्ते व पदपथावरील फेरीवाल्यांचे अतिक्रमण थांबले आहे. रस्ते मोकळे झाले आहेत. परंतु कोपरखैरणे सेक्टर १५ व १८ च्या मध्ये असलेल्या रोडवरील फेरीवाले मात्र जैसे थे आहेत. रविवारी रोडवर दोन्ही बाजूंना भाजी विक्रेते व इतर फेरीवाल्यांनी व्यवसाय सुरू केल्याने या रोडवर चक्काजाम झाले होते. नागरिकांची प्रचंड गैरसोय झाली होती. महापालिकेचे अधिकारी येथील फेरीवाल्यांवर कडक कारवाई करत नाहीत. पालिकेचे पथक गेले की पुन्हा त्या ठिकाणी व्यवसाय सुरू होत असून आयुक्त तुकाराम मुंढे हा रस्ता फेरीवालामुक्त कधी करणार, असा प्रश्न विचारत आहेत.
दबावाचे फोन बंद झाले
महापालिकेच्या विभाग कार्यालयाच्यावतीने फेरीवाले व मार्जिनल स्पेसवर नियमित कारवाई केली जात होती. परंतु कारवाई सुरू झाली की राजकीय नेते, फेरीवाला संघटनांचे प्रतिनिधी यांच्याकडून दबाव आणला जात होता. ते आमच्या ओळखीचे आहेत, त्यांच्यावर कारवाई करू नका असे सांगितले जात होते. यामुळे कारवाई थांबवावी लागत होती. परंतु मुंढे आयुक्त झाल्यापासून दबावाचे सर्व फोन बंद झाले आहेत.

Web Title: Runaway runners from the city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.