रूळांची दुरुस्ती अखेर सुरू

By Admin | Updated: October 28, 2014 23:53 IST2014-10-28T23:53:54+5:302014-10-28T23:53:54+5:30

कोकण रेल्वे : महिनाभर काम चालणार, गाड्यांचा वेग मंदच राहणार

Rule repairs are going on at the end | रूळांची दुरुस्ती अखेर सुरू

रूळांची दुरुस्ती अखेर सुरू

रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गावर गेल्या सात महिन्यात झालेल्या पाच अपघातांनंतर कोकण रेल्वेला आता जाग आली आहे. संपूर्ण कोकण रेल्वे मार्गावरील जुन्या रुळांचे मजबुतीकरण गेल्या आठवड्यापासून सुरू झाले असून, हे काम आणखी महिनाभर चालणार आहे. त्यामुळे कोकण रेल्वे मार्गावरील गाड्यांचा वेग मंदावणार आहे. या कामामुळेच मार्गावरील सर्वच गाड्या गेल्या आठवडाभरापासून तास ते दीड तास विलंबाने धावत आहेत.
कोकण रेल्वे मार्गावर गेल्या काही काळात जे पाच रेल्वे अपघात झाले, त्यामध्ये चार अपघात हे मालगाडीचे होते. एका पॅसेंजर रेल्वेचाही अपघात झाला होता. उक्षी-संगमेश्वर, वालोपे - चिपळूण, करंजाडी, रायगड जिल्ह्यातील अपघातासह पाच अपघातांना गेल्या सात महिन्यांच्या काळात कोकण रेल्वेला सामोरे जावे लागले आहे. त्यामुळे रेल्वे प्रशासनावर प्रवाशांमधून तीव्र नाराजीचा सूूर होता. त्यामुळे कोकण रेल्वेच्या व्यवस्थापनावर टीकेचा भडिमारही झाला होता.
या पाचही अपघातांमुळे कोकण रेल्वे मार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. परंतु कोकण रेल्वेच्या तांत्रिक विभागाच्या कर्मचाऱ्यांनी युध्दपातळीवर काम करून मार्ग वाहतुकीस पूर्ववत केला होता. परंतु झालेले नुकसान हे नेमके कशामुळे, याचा शोध घेतल्यानंतर पंधरा वर्षांपूर्वी सुरू झालेल्या कोकण रेल्वे मार्गावरील रूळांची दुरुस्तीच झाली नसल्याचे पुढे आले. प्रवासी रेल्वेच्या तुलनेत मालगाडीचे वजन काही पटीने अधिक असल्याने कमकुवत झालेल्या रुळांवरून मालगाडी जाताना रेल्वे रूळ फाकून अपघात झाल्याची शक्यताही व्यक्त झाली. त्यामुळे प्रवाशांच्या जीवितालाच धोका निर्माण झाला होता.
कोकण रेल्वेने रुळांची दुरुस्ती करावी, अपघात रोखण्यासाठी आवश्यक उपाययोजना करावी, यासाठी जनतेतूनही दबाव निर्माण झाला होता. मार्ग एकेरी आहे. त्यावरून दिवसभरात ५० पेक्षा अधिक रेल्वे गाड्या या मार्गावरून धावत असल्याने रूळ बदलणे सध्यातरी कोकण रेल्वेला शक्य नाही, असे लक्षात आल्यानंतर आता जुनेच रेल्वे रूळ मजबूत करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. या कामात अनेक कामगार गुंतले आहेत. संपूर्ण मार्गावर हे काम सुरू असून, त्यासाठी कामगारांंचे काही गट करण्यात आले आहेत. कंत्राटी कामगारांचीही मदत घेतली जात आहे. यानुसार मार्गावरील रुळांच्या जॉर्इंटच्या ठिकाणी नव्याने वेल्डिंग व दोन्ही बाजूला प्लेटस वेल्डिंग करणे, स्लीपर्सवरील लोखंडी पट्ट्या बदलणे यांसारखी कामे सुरू आहेत. ही कामे सुरू असल्याने मार्गावरील सर्वच रेल्वे गाड्या विलंबाने धावत आहेत.
कोकण रेल्वे मार्गावरील गाड्यांचा वेग येत्या १ नोव्हेंबरपासून वाढविला जाणार होता. मात्र, रुळ दुरुस्तीच्या कामाला अजून महिनाभराचा कालावधी लागणार असल्याने गाड्यांचा वेग वाढविणे सध्या तरी शक्य होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. उलट असलेला वेगही काम सुरू असलेल्या भागांमध्ये कमी राहणार असून, त्यामुळे गाड्यांना विलंब होणार आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Rule repairs are going on at the end

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.