इस्लामपूरच्या रुचिकाची ‘लेफ्टनंट’ पदावर मोहोर
By Admin | Updated: September 25, 2014 00:19 IST2014-09-24T23:37:18+5:302014-09-25T00:19:53+5:30
खडतर प्रशिक्षण : ‘ओटीए’ क्वीनसह पाच पुरस्कार

इस्लामपूरच्या रुचिकाची ‘लेफ्टनंट’ पदावर मोहोर
इस्लामपूर : येथील उरुण परिसरातील रुचिका प्रकाश पाटील हिने जगातील दुसऱ्या क्रमांकाची खडतर लष्करी प्रशिक्षण देणाऱ्या चेन्नई (मद्रास) येथील आॅफिसर्स ट्रेनिंग अॅकॅडमीतून ११ महिन्यांचे खडतर प्रशिक्षण पूर्ण करीत लष्करातील ‘लेफ्टनंट’ या पदावर मोहोर उठवली. या प्रशिक्षणात तिने पाच पारितोषिकांसह ‘ओटीए क्वीन’चा मानाचा किताबही पटकावला. याच अॅकॅडमीतून अफगाणिस्तान व आफ्रिकन खंडातील सेसेल्स या देशाच्या विद्यार्थ्यांनीही यश मिळवले.
बी. ई. इलेक्ट्रॉनिक्सची पदवी घेतलेल्या रुचिकाने तिचे वडील कर्नल प्रकाश शंकरराव पाटील-खेडकर (निवृत्त) यांच्या पावलावर पाऊल ठेवत लष्करात जाऊन देशसेवा करण्याचा निर्णय घेतला. अलाहाबाद (उत्तर प्रदेश) येथे झालेल्या कम्बाईन्ड डिफेन्स सर्व्हिस या परीक्षेत गुणवत्ता यादीत २० वे स्थान पटकावत रुचिकाने चेन्नईच्या अॅकॅडमीतील प्रवेश निश्चित केला. पुण्याची एन. डी. ए. डेहराडून (उत्तराखंड) येथील लष्करी संस्थांमधून २ ते ३ वर्षांचे प्रशिक्षण दिले जाते. हेच प्रशिक्षण चेन्नईच्या संस्थेत फक्त ११ महिन्यांत देताना विद्यार्थ्यांची कसोटी लागते.
रुचिकाने प्रशिक्षण पूर्ण करतानाच बास्केटबॉल या खेळासह बुध्दिमत्ता, आत्मविश्वास, व्यक्तिमत्त्व विकास अशा अनेकविध क्षेत्रात ठसा उमटवत ओटीए क्वीनचाही बहुमान मिळवला. ती ‘लेफ्टनंट’ झाली असून, जोधपूर लष्करी तळावर तिची नियुक्ती झाली आहे. रुचिकाला वडील कर्नल प्रकाश पाटील, आई सौ. तृप्ती पाटील, भाऊ क्षितीज यांचे प्रोत्साहन व काका डॉ. भगवान पाटील, इस्लामपूर मेडिकल फौंडेशनचे अध्यक्ष डॉ. विश्वास पाटील, श्रीराम पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. (वार्ताहर)