मुंबई पोलीस दलातील ‘रुबी’ची कर्करोगाशी झुंज
By Admin | Updated: June 10, 2017 03:22 IST2017-06-10T03:22:47+5:302017-06-10T03:22:47+5:30
घरात कुणी गंभीर आजारी असले तर कुटुंबातील सर्वांनाच चिंता लागून राहते. त्याला योग्य आणि प्रभावी उपचार मिळतील, असे प्रयत्न सुरू होतात.

मुंबई पोलीस दलातील ‘रुबी’ची कर्करोगाशी झुंज
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : घरात कुणी गंभीर आजारी असले तर कुटुंबातील सर्वांनाच चिंता लागून राहते. त्याला योग्य आणि प्रभावी उपचार मिळतील, असे प्रयत्न सुरू होतात. अशीच काहीशी स्थिती सध्या मुंबई पोलीस दलाची झालेली आहे. मुंबई पोलीस दलाच्या परिवारातील ‘रुबी’ श्वान सध्या टाटा रुग्णालयात कर्करोगाशी झुंज देत आहे. अनेक गुन्ह्यांच्या तपासात महत्त्वाची भूमिका बजावलेल्या ‘रुबी’ला वाचवण्यासाठी सध्या पोलीस दलाचे अविरत प्रयत्न सुरू आहेत.
सात वर्षांच्या रुबीच्या मूत्राशयाशेजारी ट्यूमर आढळला असून तो दिवसागणिक वाढत आहे. या ट्यूमरवर शस्त्रक्रिया करणे कठीण असल्याने सध्या रुबीवर रेडिएशन थेरपी सुरू असल्याचे डॉ. प्रदीप चौधरी यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
जंजीरची आठवण-
श्वान पथकाचा फायदा मुंबई पोलीस दलाला अनेक गुंतागुंतीच्या केसेसमध्ये मोठ्या प्रमाणावर होत आहे.
१९९३च्या बॉम्बस्फोट मालिकेनंतर आरोपींनी काही ठिकाणी पेरलेल्या स्फोटकांचा, शस्त्रास्त्रांचा छडा लावून महत्त्वाची भूमिका पोलीस दलातील श्वान ‘जंजीर’ने बजावली होती. त्याव्यतिरिक्त त्याने ११ मिलिटरी बॉम्ब, ५७ गावठी बॉम्ब, १७५ पेट्रोल बॉम्ब आणि ६०० डिटोनेटरही शोधून काढले. अखेरीस जंजीरला हाडाचा कर्करोग झाला आणि १६ नोव्हेंबर २००० रोजी त्याचा मृत्यू झाला. रुबीला झालेल्या कर्करोगाच्या निदानामुळे जंजीरची आठवण पुन्हा एकदा झाली आहे.