आरटीआय कार्यकर्त्यावर हल्ला

By Admin | Updated: October 31, 2015 02:29 IST2015-10-31T02:29:10+5:302015-10-31T02:29:10+5:30

माहिती अधिकार कार्यकर्ते मल्लिकार्जुन भाईकट्टी यांनी शाहू महाविद्यालयाच्या बांधकामाविरोधात आरटीआय अर्ज करून संस्थेला बदनाम केल्याचा आरोप करत शिवसैनिकांनी शुक्रवारी त्यांच्यावर प्राणघातक हल्ला केला

RTI activists attacked | आरटीआय कार्यकर्त्यावर हल्ला

आरटीआय कार्यकर्त्यावर हल्ला

लातूर : माहिती अधिकार कार्यकर्ते मल्लिकार्जुन भाईकट्टी यांनी शाहू महाविद्यालयाच्या बांधकामाविरोधात आरटीआय अर्ज करून संस्थेला बदनाम केल्याचा आरोप करत शिवसैनिकांनी शुक्रवारी त्यांच्यावर प्राणघातक हल्ला केला. शिवसैनिकांच्या या गुंडगिरीने लातूर शहर हादरले. भाईकट्टी यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
भाईकट्टी यांना घरातून उचलून महाविद्यालयाच्या प्रांगणात नेत हजारो विद्यार्थ्यांसमोर त्यांच्यावर आॅईल ओतले. त्यानंतर लाथा, बुक्क्यांनी मारहाण केली.
हल्ल्यात बेल्ट, रॉड, हंटर आणि चेनचाही वापर करण्यात आला. लातुरातील आदर्श संस्था असलेल्या शाहू महाविद्यालयाशी काडीचाही संबंध नसणाऱ्या शिवसेना कार्यकर्त्यांच्या या कृत्यामुळे शहरात दहशत आहे.
गुरुवारी भाईकट्टी यांनी शिवछत्रपती शिक्षण संस्थेच्या शाहू महाविद्यालयाने आपल्या कनिष्ठ महाविद्यालयाच्या इमारतीचे बसवेश्वर चौकात केलेले बांधकाम अनधिकृत असल्याचा आरोप केला होता.
माझ्या तक्रारीनंतर महापालिकेने इमारत पाडण्याचे आदेश दिल्याचे त्यांनी सांगितले होते. त्यानंतर शुक्रवारी सकाळी शिवसेनेचे नेते अभय साळुंके आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी दोन ते तीन गाड्या घेऊन त्यांचे घर गाठले. तुम्ही अनधिकृत बांधकामाविरोधात चांगले काम केल्याने तुमचा सत्कार करायचा असल्याचे त्यांना सांगितले.
भाईकट्टी यांच्या शरीरावर गंभीर जखमा झाल्या आहेत. पोलिसांनी जबाब नोंदविला असून, लातूर ग्रामीण पोलिसात शिवाजी भोसले यांच्यासह अन्य २५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. (प्रतिनिधी)
जिल्हाप्रमुखांनी हात झटकले
मारहाणीचा निषेध करत, या हल्ल्याशी शिवसैनिकांचा संबंध नसल्याचे जिल्हाप्रमुख बालाजी भोसले यांनी सांगितले.
संरक्षणाची केली होती मागणी
भाईकट्टी यांनी जिवाला धोका असल्याने पोलीस संरक्षण मिळावे, यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक ज्ञानेश्वर चव्हाण यांच्याकडे चार महिन्यांपूर्वीच लेखी अर्ज दाखल केला होता.
७२ प्रकरणांत चौकशी
भाईकट्टी यांनी आतापर्यंत ७८ विभागांत माहितीच्या अधिकाराचा वापर केला. त्यातून ७२ प्रकरणांत चौकशी सुरू आहे. ८ अधिकाऱ्यांची विभागनिहाय चौकशी सुरू आहे. तर ४ अधिकाऱ्यांना भ्रष्टाचार प्रकरणात निलंबितही करण्यात आले आहे.

Web Title: RTI activists attacked

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.