योगेश पांडे नागपूर - भारतात मोठ्या काळापासून विविधता असूनदेखील समाजात एकता आहे. मात्र काही लोक जाणुनबुजून एकतेवर प्रहार करण्याचे प्रयत्न होतात. विशेषतः श्रद्धास्थाने, महापुरुष व प्रार्थनास्थळांसंबंधात अनादराच्या घटना घडतात. तसेच लहानसहान बाबींवरून किंवा संशयावरून कायदा हातात घेणे, गुंडगिरी, हिंसाचार करणे अशा गोष्टी होतात. परंतु ही पद्धत अयोग्य आहे. अशा घटना पूर्वकल्पित कल्पनेने किंवा एखाद्या विशिष्ट समुदायाला चिथावणी देण्यासाठी घडवल्या जातात. त्यांच्या जाळ्यात अडकले जाणे तात्काळ आणि दीर्घकालीन ध्येयासाठी हानिकारक आहे. हिंसा हे प्रश्नांचे उत्तर नाही, लोकशाहीतूनच आमूलाग्र बदल शक्य आहे, या शब्दांत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांनी राजकीय पक्षांसोबत समाजात भेद उत्पन्न करणाऱ्या तत्वांचे कान टोचले. नागपुरातील रेशीमबाग मैदानात संघाच्या शताब्दी वर्षातील विजयादशमी व शस्त्रपूजन उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी भारताचे माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद, प्रांतिक संघचालक दीपक तामशेट्टीवार, सह-संघचालक श्रीधरजी गाडगे आणि महानगर संघचालक राजेश लोया हे प्रामुख्याने उपस्थित होते. आपल्या शेजारील देशांमध्ये मोठ्या प्रमाणात अशांतता आहे. श्रीलंका, बांगलादेश पाठोपाठ नेपाळमध्ये सत्तांतरास कारणीभूत ठरलेल्या जनतेचा हिंसक उद्रेक चिंताजनक आहे.अशा अशांतता निर्माण करू पाहणाऱ्या शक्ती भारतात तसेच जागतिक स्तरावर सक्रिय आहेत. परंतु हिंसक उद्रेकांमध्ये इच्छित बदल घडवून आणण्याची शक्ती नसते. केवळ लोकशाही मार्गांनीच समाज आमूलाग्र बदल साध्य करू शकतो. हिंसक घटनांमुळे जागतिक वर्चस्ववादी शक्तींना गैरफायदा घेण्याची संधी मिळते. आपले शेजारी देश सांस्कृतिकदृष्ट्या भारताशी जोडलेले आहेत. एक प्रकारे, ते आपले कुटुंबीयच आहेत. आपल्या शेजारी देशांमध्ये आपल्या स्वतःच्या हितांचे रक्षण करण्यापेक्षा शांतता, स्थिरता, प्रगती भारताच्या समृद्धीसाठी अत्यंत आवश्यक आहे, असे सरसंघचालक म्हणाले.
कोणत्याही देशाच्या प्रगतीमध्ये सामाजिक एकता हा एक महत्त्वाचा घटक आहे. आपला देश प्राचीन काळापासून विविधतापूर्ण आहे, परंतु समाज, राष्ट्र आणि संस्कृती म्हणून आपण एक आहोत. आपल्या राष्ट्रीय एकतेची भावना सर्वसमावेशक आहे. आपण आपल्या एकतेचा पाया कधीही विसरू नये. जगाच्या समस्यांवर कायमस्वरूपी उपाय देणारी एक नवीन निर्मिती आवश्यक आहे. आपल्या समग्र आणि एकात्मिक दृष्टिकोनावर आधारित अशा निर्मितीसाठी केवळ भारतच एक अनुकरणीय आदर्श देऊ शकतो. या दृष्टिकोनासह, आपण विकासाचा मार्ग आखला पाहिजे आणि जगासमोर एक गौरवशाली उदाहरण सादर केले पाहिजे, असे प्रतिपादन सरसंघचालकांनी केले.
ऑपरेशन सिंदूरमध्ये दिसली समाजाची एकताकाश्मीरमधील पहलगाम हल्ल्यानंतर, भारतातील नागरिक दुःख आणि संतापाने भरले होते. सरकारने योग्य प्रत्युत्तर दिले. या काळात, देशाने नेतृत्वाची ताकद, आपल्या सैन्याचे शौर्य आणि समाजाची उल्लेखनीय एकता पाहिली असे सरसंघचालक म्हणाले.
ट्रम्प टॅरिफबाबत स्वदेशी आणि स्वावलंबनाशिवाय पर्याय नाही अमेरिकेने स्वतःच्या हिताच्या आधारावर आयात शुल्क धोरण लागू केले आहे. यामुळे आपल्यालाही काही गोष्टींवर पुनर्विचार करावा लागेल. जग परस्परावलंबनावर चालते, परंतु आपण त्याला सक्ती न बनवता स्वावलंबी होण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले पाहिजेत. परमपूज्य सरसंघचालकांनी त्यांच्या भाषणात स्पष्टपणे सांगितले की स्वदेशी आणि स्वावलंबनातूनच स्वावलंबन मिळवता येते आणि त्याला पर्याय नाही, असे प्रतिपादन सरसंघचालकांनी केले.
महात्मा गांधींबाबत संघमंचावर गौरवोद्गारयावेळी सरसंघचालकांनी महात्मा गांधी यांच्याबाबत गौरवोद्गार काढले. महात्मा गांधी आपल्या स्वातंत्र्याच्या प्रमुख शिल्पकारांपैकी एक आहेत.स्वातंत्र्योत्तर 'स्व' आधारित भारताची संकल्पना दृढ करणाऱ्या तत्वज्ञानींमध्ये त्यांचे आदराचे स्थान आहे, असे सरसंघचालक म्हणाले.
Web Summary : RSS Chief Mohan Bhagwat emphasized unity and democracy, cautioning against divisive forces. He highlighted India's strength in diversity, advocating for peaceful progress and self-reliance amidst global challenges. Social unity, not violence, is the path.
Web Summary : आरएसएस प्रमुख मोहन भागवत ने एकता और लोकतंत्र पर जोर दिया, विभाजनकारी ताकतों के खिलाफ चेतावनी दी। उन्होंने विविधता में भारत की ताकत को उजागर किया, शांतिपूर्ण प्रगति और वैश्विक चुनौतियों के बीच आत्मनिर्भरता की वकालत की। सामाजिक एकता ही मार्ग है, हिंसा नहीं।