भुजबळांंमुळे ८७० कोटींचा तोटा
By Admin | Updated: February 3, 2016 03:55 IST2016-02-03T03:55:06+5:302016-02-03T03:55:06+5:30
भुजबळ कुटुंबियांचा सहभाग असलेल्या घोटाळ्यातून अर्थखात्याला तब्बल ८७० कोटी रुपयांचा तोटा झाला असून, त्यापैकी ११४ कोटी रुपयांसंबंधित गुन्हे नोंदविण्यात आले आहेत.

भुजबळांंमुळे ८७० कोटींचा तोटा
मुंबई : भुजबळ कुटुंबियांचा सहभाग असलेल्या घोटाळ्यातून अर्थखात्याला तब्बल ८७० कोटी रुपयांचा तोटा
झाला असून, त्यापैकी ११४ कोटी रुपयांसंबंधित गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. उर्वरित ७५० कोटी रुपयांसंबंधित गुन्ह्यांची माहिती घेणे अजून सुरू आहे, असे अंमलबजावणी संचालनालयाने न्यायालयाला सांगितले.
समीर भुजबळ हे मनी लाँडरिंग प्रकरणातील प्रमुख संशयित असल्याचे सांगत संचलनालयाने त्यांच्या कोठडीची मागणी केली. अतिरिक्त सत्र न्यायाधीश
पी. आर. भावके यांनी दोन्ही बाजुंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर समीर यांना
८ फेबु्रवारीपर्यंत ईडीची कोठडी सुनावली आहे.
माजी खासदार समीर भुजबळ यांना मंगळवारी पहाटे एकच्या सुमारास अटक करण्यात आल्यानंतर मंगळवारी सांयकाळी ४ वाजता त्यांना येथे न्यायालयात हजर करण्यात आले. तत्पूर्वी त्यांना वैद्यकीय तपासणीसाठी सेंट जॉर्ज रूग्णालयात नेण्यात आले होते. त्यावेळी समीर हे त्रस्त दिसत होते. यावेळी सक्तवसुली संचालनालयाचे (ईडी) अधिकारीही मोठ्या संख्येने हजर होते.
समीर म्हणाले की, आपल्याला अटक करण्याची काहीही गरज नव्हती. कारण आपण आवश्यक ते सर्व कागदपत्रे ईडीला दिले आहेत. राजकीय सूडभावनेतून आपल्याविरुद्ध ही कारवाई करण्यात आली असल्याचा आरोपाही त्यांनी यावेळी केला. दरम्यान, आपल्याविरुद्ध कारवाई होणार असल्याची माहिती किरीट सोमय्या यांना अगोदरच कशी मिळाली, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे.
सहकार्य करूनही केली गेली अटक
मला चौकशीसाठी बोलविले त्यावेळी मी व्यस्त होतो. पण, दोघांनाही सोयीची ठरेल अशी तारीख निश्चित करण्याबाबत मी लेखी पत्र दिले होेते. खारघर पोलिसात याबाबत माझा जबाब दिलेला आहे. सोमवारी मी तपास अधिकाऱ्यांना पूर्ण सहकार्य केले तथापि, मंगळवारी पहाटे एक वाजता मला अटक करण्यात आली.
> मी मागास असल्यानेच कारवाई - भुजबळ
पुतण्या समीर यांस ईडीने अटक केल्याची वार्ता समजताच सध्या अमेरिकेत असलेले छगन भुजबळ यांनी तातडीने एक व्हिडीओ जारी करून आपले म्हणणे प्रसारमाध्यमांपर्यंत पोहोचविले. आपण ओबीसी असून, मागास वर्गाच्या उत्थानासाठी कार्य करीत असल्यानेच आपल्याविरुद्ध सूडबुद्धीने कारवाई केली जात असून, हे एक राजकीय षडयंत्र आहे, असा दावा भुजबळ यांनी त्या व्हिडीओत केला आहे.
कारवाई नियमानुसारच
- रावसाहेब दानवे
राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केलेले आरोप चुकीचे असून, भुजबळ यांच्यावरील कारवाई ही सूडबुद्धीने नव्हे, तर भ्रष्टाचाराच्या आरोपात तथ्य आढळल्यानेच केली आहे. शिवाय न्यायालयाने आदेश देऊन ईडी विभागाच्या चौकशीस सहकार्य करीत नसल्यानेच माजी खासदार समीर भुजबळ यांना अटक करण्यात आल्याचा दावा भाजपा प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांनी नाशिक येथे पत्रकारांशी बोलताना केला.