डोंबिवलीत पकडली ४० लाखांची रोकड
By Admin | Updated: October 11, 2014 05:31 IST2014-10-11T05:31:36+5:302014-10-11T05:31:36+5:30
कल्याण-डोंबिवलीमधील एका बांधकाम व्यावसायिकाच्या गाडीत निवडणूक विभागाने शुक्रवारी दुपारी केलेल्या कारवाईत सुमारे ४० लाख रुपयांची रोकड आढळली़

डोंबिवलीत पकडली ४० लाखांची रोकड
डोंबिवली : कल्याण-डोंबिवलीमधील एका बांधकाम व्यावसायिकाच्या गाडीत निवडणूक विभागाने शुक्रवारी दुपारी केलेल्या कारवाईत सुमारे ४० लाख रुपयांची रोकड आढळली़ जिल्ह्यात प्रचंड चर्चा झाल्याने व्हॉट्सअॅपवर याबाबतच्या मेसेजेसला उधाण आले होते. त्या बिल्डरच्या मते, ही रक्कम ते एका प्रकल्पानिमित्त कराव्या लागणाऱ्या रजिस्ट्रेशनसाठी घेऊन जात असल्याचेही सांगण्यात आले. दुपारच्या वेळेत निवडणूक भरारी पथकासह रामनगर पोलीस ठाण्याच्या स्क्वॉडने ही गाडी तपासणीसाठी अडवली. त्या वेळी गाडीच्या मागील आसनावर ही रक्कम आढळून आल्याचे पोलिसांनी सांगितले. रात्री उशिरापर्यंत याबाबतची चौकशी सुरू असल्याचे निवडणूक अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
नाकाबंदीत कळव्यात सापडले ११ लाख २६ हजार
ठाणे - कळवा, पारसिक नाका येथे गुरुवारी रात्री ठाणे पोलिसांच्या नाकाबंदीत एका इको कारमध्ये ११ लाख २६ हजारांची रोकड सापडली. ठाण्यात राहणारे चार जण कल्याणमधून हे पैसे बँकेत भरण्यासाठी घेऊन येत असताना ही कारवाई करण्यात आली. कळवा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक जे. टी. घावटे यांचे पथक पारसिक नाका येथे नाकाबंदी करीत होते. याचदरम्यान, पोलिसांकडून वाहन तपासणी सुरू होती. त्या वेळी ही रक्कम सापडली. त्यानंतर गाडीतील चौघांची चौकशी केली असता ते एका रिटेल प्रा.लि. कंपनीचे कर्मचारी असून, त्या कंपनीचे गोळा केलेले पैसे बँकेत भरण्यासाठी ठाण्यात घेऊन येत होते, असे त्यांनी पोलिसांना सांगितले. कळवा पोलीस ठाण्यात याबाबत नोंद करण्यात आली आहे. तसेच या पैशांबाबत आयकर विभाग आणि निवडणूक आयोगालाही माहिती देण्यात आली असून, ही रोकड आयकर विभागाकडे जमा करण्यात येणार आहे. तसेच कंपनी आणि त्या रोकडबाबत सखोल चौकशी सुरू असल्याची माहिती कळवा पोलिसांनी दिली. (प्रतिनिधी)