अमोल अवचितेफलटण : तुझी सेवा करेन मनोभावे हो ! माझे मन गोविंद रंगले हो! नवसिले माझे नवसिले हो! पंढरीचे दैवत हो बाप ! रुखमादेवी विठ्ठल हो! चित्त चैतन्य चोरुनी नेले! चांदोबाचा लिंब येथे रंगलेल्या पहिल्या उभ्या रिंगण सोहळ्याची ऊर्जा घेऊन तरडगाव मुक्कामानंतर शाही स्वागतात ऐतिहासिक फलटण नगरीत संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी विमानतळ मैदानावर विसावली. तरडगावातुन माऊली माऊलीच्या जयघोषात सकाळी साडे सहाच्या सुमारास पालखी मोठ्या उत्साहात निघाली. पहिला विसावा दत्त मंदिर काळज सुरवडी, दुसरा विसावा निंभोरे ओढा तर फलटण दुध डेअरी येथे तिसरा विसावा घेऊन फलटण नगरीत संध्याकाळी सहाच्या सुमारास विसावली. तालुका दूध संघावर पालखी दिंड्यातील विणेकऱ्यांचे श्रीफळ आणि शाल देऊन स्वागत करण्यात आले. निंबाळकर देवस्थानने पालखीचे स्वागत केले. पालखीच्या स्वागतासाठी नगरातील भक्तांनी मार्गावर रांगोळ्या काढल्या होत्या.
........फलटण हे हिंदुस्थानातील एक संस्थान होते. नाईक-निंबाळकर हे संस्थानचे राजा होते. फलटण हे एक पुरातन शहर असून बाणगंगा नदी तिरावर वसलेले आहे. महानुभाव पंथीयांची दक्षिणकाशी म्हणून फलटण ओळखले जात असे. दरवर्षी चैत्र वद्य प्रतिपदेला फलटणला घोड्यांची जत्रा होते. या जत्रेला पंजाब, बिहार, उत्तर भारतातून भाविक मोठ्या प्रमाणात सहभागी होतात. दर वर्षी नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यात श्रीराम रथोत्सव साजरा केला जातो. फलटण येथील पुरातन जबरेश्वर मंदिरही प्रसिद्ध आहे.
* पालखी शुक्रवारी फलटण मधुन सकाळी मार्गस्थ होऊन बरडमध्ये मुक्कामी विसावणार आहे.