‘कावनई’त शाही स्नानाची पर्वणी
By Admin | Updated: September 7, 2015 01:30 IST2015-09-07T01:30:41+5:302015-09-07T01:30:41+5:30
हिरवाईने नटलेल्या कावनई येथील श्री क्षेत्र कपिलधारा तीर्थात तिन्ही आखाड्यांच्या साधुंनी रविवारी शाहीस्नानाची पर्वणी साधली. सुटीचे औचित्य साधत

‘कावनई’त शाही स्नानाची पर्वणी
नाशिक : हिरवाईने नटलेल्या कावनई येथील श्री क्षेत्र कपिलधारा तीर्थात तिन्ही आखाड्यांच्या साधुंनी रविवारी शाहीस्नानाची पर्वणी साधली. सुटीचे औचित्य साधत दिवसभरात सुमारे दोन ते अडीच लाख भाविकांनी हा सोहळा अनुभवला.
इगतपुरी तालुक्यातील श्री क्षेत्र कपिलधारा तीर्थ हे सिंहस्थ कुंभमेळ्याचे मूळ स्थान मानले जाते. कपिलमुनी व गजानन महाराजांच्या तपश्चर्येने पुनित झालेली ही भूमी असल्याची अख्यायिका आहे. त्यामुळे गेल्या कुंभमेळ्यापासून नाशिक-त्र्यंबकेश्वरसह श्री कपिलधारा तीर्थ येथेही शाहीस्नानाची पर्वणी आयोजित केली जाते.
श्री कपिलधारा तीर्थाचे महंत रामनारायणदास फलाहारी महाराज व विश्वस्तांनी साधू-महंतांचे स्वागत केले. त्यानंतर छत्र-चामरे, निशाण उंचावत, हातात चांदीच्या चौरंगावर इष्टदेवता घेत, ‘सियावर रामचंद्र की जय’, ‘पवनपुत्र हनुमान की जय’चा जयघोष करीत शेकडो साधू-महंतांनी श्री कपिलधारा तीर्थाकडे मिरवणुकीने कूच केले.
अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष श्री महंत ग्यानदास, जगद्गुरू हंसदेवाचार्य यांच्या हस्ते विधिवत गंगापूजन, इष्टदेवतांचे पूजन करण्यात आले.
त्यानंतर दिगंबर अनी आखाड्याचे श्री महंत रामकिशोरदास शास्त्री, निर्मोही अनी आखाड्याचे
श्री महंत राजेंद्रदास, निर्वाणीअनी आखाड्याचे श्री महंत धरमदास आदींनी शाहीस्नान केले. (प्रतिनिधी)