मुलींच्या खोलीत सचिवपुत्राचा बेधडक प्रवेश
By Admin | Updated: December 26, 2014 00:44 IST2014-12-26T00:44:19+5:302014-12-26T00:44:19+5:30
तपोवनातील बालगृहात वास्तव्यास असलेल्या मुलींच्या कक्षात सचिव श्रीराम गोसावी यांचा पुत्र बेधडक प्रवेश करायचा. मुलींच्या गळ्यात हात घालायचा. या गंभीर प्रकाराची तक्रार बालगृहातीलच मुलींनी सचिव

मुलींच्या खोलीत सचिवपुत्राचा बेधडक प्रवेश
गोसावींची दुसरी पिढीही : वडील म्हणाले, 'त्याची तक्रार अधीक्षकांकडे करा, मी सचिव!'
गणेश देशमुख - अमरावती
तपोवनातील बालगृहात वास्तव्यास असलेल्या मुलींच्या कक्षात सचिव श्रीराम गोसावी यांचा पुत्र बेधडक प्रवेश करायचा. मुलींच्या गळ्यात हात घालायचा. या गंभीर प्रकाराची तक्रार बालगृहातीलच मुलींनी सचिव श्रीराम गोसावी यांच्याकडे केली होती; तथापि अधीक्षकांकडे तक्रार करा. मी सचिव आहे, असा अफलातून सल्ला त्यांनी मुलींना दिला होता.
त्याग अन् सेवाभावाची भूमी असलेल्या तपोवनात कार्यरत असणाऱ्यांची मानसिकता बघा! पुत्राच्या अश्लील वागणुकीची तक्रार केल्यानंतरही सचिवांनी त्या तक्रारीची दखल घेतली नाही. ज्या अधीक्षकांकडे तक्रार करण्यास मुलींना गोसावींनी सांगितले ते गजानन चुटे असल्या अनैतिक आणि नियमबाह्य बाबींना बळ देणारेच होते. मुलींच्या तक्रारी दडपण्यासाठीच ते सर्व मुलींमध्ये ओळखले जायचे. चुटेला याच कारणासाठी पोलिसांनी अटकही केली.
गोसावीच्या मुलाचा असा प्रकार ज्या मुलींना खपत नव्हता त्यापैकी मोजक्या मुलींनी प्रशासक असलेल्या अजय लहाने यांच्याकडे तक्रार केली होती. इतक्या गंभीर प्रकरणाची तक्रार झाल्यावर लहाने यांनी खडबडून जागे व्हायला हवे होते. तातडीने या प्रकाराची स्वत:च्या पातळीवर चौकशी करायला हवी होती. इतकेच नव्हे, तर गोपनीय पद्धतीने माहिती घ्यायला हवी होती. परगावी राहणाऱ्या गोसावीच्या मुलाचा बालगृहाशी काय संबंध? तो बालगृहात येतो कसा? त्याचे मित्र बालगृहात कुण्या अधिकाराने शिरतात? तो मुलींच्या खोलीत प्रवेश करतोच कसा? या मुद्यांची त्यांनी गांभीर्याने दखल घ्यायला हवी होती.
अधीक्षक गजानन चुटे, श्रीराम गोसावी आणि त्यांच्या मुलाविरुद्ध लहाने यांनी पोलीस तक्रार नोंदवायला हवी होती. प्रशासकाचे हेच कर्तव्य ठरते. 'केअर अॅन्ड प्रोटेक्शन अॅक्ट' अंतर्गत बालगृहातील मुली सुरक्षित रहाव्यात यासाठीच लहाने यांनी नियुक्ती करण्यात आली आहे; तथापि, वर्षभरापूर्वीच्या या प्रकारानंतरही लहाने यांनी मुलींच्या सुरक्षिततेसाठी कुठलेही पाऊल उचलले नाही.