छत हरपल्याने मंदिराचा आसरा

By Admin | Updated: March 2, 2017 02:53 IST2017-03-02T02:53:48+5:302017-03-02T02:53:48+5:30

अनधिकृत इमारतींवरील कारवाईमुळे उघड्यावर आलेल्या कुटुंबातील विद्यार्थ्यांपुढे भवितव्याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले

The roof of the temple was destroyed due to the roof of the temple | छत हरपल्याने मंदिराचा आसरा

छत हरपल्याने मंदिराचा आसरा

सूर्यकांत वाघमारे,
नवी मुंबई- अनधिकृत इमारतींवरील कारवाईमुळे उघड्यावर आलेल्या कुटुंबातील विद्यार्थ्यांपुढे भवितव्याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. ऐन परीक्षेच्या काळात त्यांच्यावर हे संकट कोसळले असून त्यामधील बहुतेक विद्यार्थी बारावीची परीक्षा देत आहेत. अनेक वर्षांपासून वास्तव्य असलेले घरच राहिले नसल्यामुळे अखेर परीक्षेच्या तयारीसाठी त्यांना मंदिराचा आसरा घ्यावा लागला आहे.
न्यायालयाच्या निर्देशानुसार दिघा येथील अनधिकृत इमारतींवर एमआयडीसीने कारवाईला सुरुवात केली आहे. मंगळवारी नियोजित चारपैकी दोन इमारतींवर एमआयडीसीतर्फे जप्तीची कारवाई करण्यात आली. ही कारवाई काही दिवसांकरिता पुढे ढकलावी अशी तिथल्या रहिवाशांची मागणी होती. मात्र न्यायालयाच्या आदेशाला बगल न देताच एमआयडीसीने दोन इमारतींवर कारवाई केली. भूमाफियांनी स्वत:च्या फायद्यासाठी उभारलेल्या या इमारतींमधील घरे विकून त्यांची फसवणूक केलेली आहे. परंतु या संपूर्ण प्रकरणात भरडला गेलेला आहे तो फक्त सामान्य घर खरेदीदार. या कारवाईमुळे त्याठिकाणची अनेक कुटुंबे बेघर झाली आहेत. याचा सर्वाधिक मनस्ताप विद्यार्थ्यांना झाला असून अनेक जण दहावी, बारावीचे विद्यार्थी आहेत. ऐन बारावीच्या परीक्षेच्या काळात बेघर झाल्यामुळे परीक्षा द्यायची की नाही? द्यायची तर कशी? असे प्रश्न त्यांना सतावत आहेत. त्यावर उपाय म्हणून काही कुटुंबीयांनी विद्यार्थ्यांकरिता मंदिरात ठाण मांडले आहे.
कौटुंबिक परिस्थितीत सुधार घडवण्यासाठी शिक्षण हाच पर्याय असल्याने अनेक विद्यार्थी उच्च शिक्षणाचीही तयारी करत आहेत. तर मुलांना परीक्षेचा अभ्यास करता यावा व त्यांचे भविष्य उज्ज्वल व्हावे अशी पालकांची धारणा आहे. यामुळे त्यांनाही नाइलाजास्तव उघड्यावर संसार मांडावा लागला आहे. दुसरीकडे राहायला जायचे तर आर्थिक भार सोसणार कसा? जरी नातेवाइकांकडे आधार मिळाला तर विद्यार्थ्यांची शिक्षणाची गैरसोय होईल अशीही चिंता त्यांना सतावत आहे.
या सर्व संकटांवर मात करून परीक्षा देण्याची जिद्द अनेक विद्यार्थ्यांमध्ये आहे. याच जिद्दीने दिवस-रात्र एक करून मंदिराच्या आवारात ते अभ्यासासाठी जमत आहेत. त्यापैकीची निशा गुप्ता या बारावीच्या विद्यार्थिनीने स्वत:च्या भवितव्याची चिंता व्यक्त केली आहे. परीक्षेत उत्तम गुणांनी पास होण्याची तयारी सुरू असतानाच आपल्यावर बेघर होण्याची वेळ आल्याची नाराजी तिने व्यक्त केली. परंतु या संकटाला खचून न जाता मंदिरात बसून अभ्यास करून परीक्षा देत असल्याचेही तिने सांगितले. (प्रतिनिधी)

Web Title: The roof of the temple was destroyed due to the roof of the temple

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.