सेना सत्तेत गेली तर विरोधकाची भूमिका
By Admin | Updated: December 1, 2014 02:08 IST2014-12-01T02:08:15+5:302014-12-01T02:08:15+5:30
भाजपाने शिवसेनेला सत्तेत बरोबर घेतले तर राष्ट्रवादी काँग्रेसला वाईट वाटण्याचे कारण नाही. पुन्हा निवडणुकांना सामोरे जावे लागू नये

सेना सत्तेत गेली तर विरोधकाची भूमिका
मुंबई : भाजपाने शिवसेनेला सत्तेत बरोबर घेतले तर राष्ट्रवादी काँग्रेसला वाईट वाटण्याचे कारण नाही. पुन्हा निवडणुकांना सामोरे जावे लागू नये, राष्ट्रपती राजवट लागू होऊ नये, म्हणून सरकारला पाठिंबा दिला होता. शिवसेना सत्तेत गेली तर विरोधी पक्षनेतेपद मोकळे होईल आणि राष्ट्रवादी विरोधकाची भूमिका बजावेल, असे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले. सरकारला पाठिंबा द्या, अशी मागणी भाजपाने केलेली नाही. शिवाय आमच्या नेतृत्वाने शिवसेना सत्तेत सहभागी झाली तर सुंठीवाचून खोकला जाईल, असे मत व्यक्त केले असल्याचे ते म्हणाले.
पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन कापसाला ६,५०० रुपये हमीभाव द्यावा, साखरेवरील आयात कर २५ टक्क्यांऐवजी ४० टक्के करावा, मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांत दुष्काळ जाहीर करावा, जवखेड्यातील हत्याकांडाचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावा, आदी मागण्या केल्या. विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन पुढील आठवड्यापासून सुरू होत असून त्यापूर्वी राज्यातील शेतकरी, साखर कारखाने यांच्या समस्यांकडे सरकारचे लक्ष वेधले आहे. यामुळे सरकारला कार्यवाही करण्यास पुरेसा वेळ मिळेल, असे ते म्हणाले. महाराष्ट्रातील कुठलाही समाजघटक अडचणीत आला तर त्याची बाजू सभागृहात मांडणे हे आम्ही आमचे कर्तव्य समजतो. राज्यात आमचे सरकार असताना सरकारी मदतीचे निकष बाजूला ठेवून दुष्काळग्रस्त, गारपीटग्रस्त यांना विशेष मदत दिली आहे. आताही सरकारने तशीच कृती करावी, अशी मागणी त्यांनी यावेळी केली. (विशेष प्रतिनिधी)