Rohit Sharma-Devendra Fadnavis : भारतीय क्रिकेट संघाचा स्टार फलंदाज 'हिटमॅन' रोहित शर्माने काही दिवसांपूर्वीच कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. आता निवृत्तीनंतर रोहितने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची 'वर्षा' निवासस्थानी भेट घेतली. स्वतः मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'एक्स' वर या बैठकीचे फोटो शेअर केले आहेत.
फोटो शेअर करत देवेंद्र फडणवीसांनी लिहिले, "भारतीय क्रिकेटपटू रोहित शर्माचे माझ्या अधिकृत निवासस्थान 'वर्षा' मध्ये स्वागत करणे, त्याला भेटणे आणि संवाद साधणे हा आनंददायी अनुभव होता. कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्याबद्दल आणि त्याच्या पुढील कारकिर्दीबद्दल मी त्याचे अभिनंदन केले आणि शुभेच्छा दिल्या!"
भेटीचे कारण काय ?या भेटीमागे काही विशेष कारण होते, की ती फक्त एक औपचारिक भेट होती, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. पण ही बैठक ज्या पद्धतीने झाली, त्यामुळे क्रीडाप्रेमी आणि राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या आहेत. या भेटीचे कारण येत्या काळात समोर येईलच.
रोहित शर्माची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीरोहित शर्माने 7 मे रोजी एका इंस्टाग्राम पोस्टद्वारे कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेत असल्याचे जाहीर केले होते. त्याने आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमधून यापूर्वीच निवृत्ती घेतली आहे. म्हणजेच, यापुढे तो फक्त एकदिवसीय सामने खेळताना दिसेल. विशेष म्हणजे, रोहित शर्माच्या निवृत्तीनंतर भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली यानेदेखील 12 मे रोजी कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली.
रोहितची कसोटी कारकीर्द
रोहित शर्माने 11 वर्षांच्या कसोटी क्रिकेटमध्ये 67 सामने खेळले, त्यापैकी 24 कसोटींमध्ये त्याने कर्णधारपद भूषवले. या सामन्यांमध्ये 40.57 च्या सरासरीने एकूण 4301 धावा केल्या, ज्यामध्ये 12 शतके आणि 18 अर्धशतके समाविष्ट आहेत. रोहितने 2013 मध्ये कोलकाताच्या ईडन गार्डन्स येथे वेस्ट इंडिजविरुद्धच्या त्याच्या पदार्पणाच्या सामन्यात शतक झळकावले होते. रोहितने त्याचा शेवटचा कसोटी सामना 26 डिसेंबर 2024 रोजी ऑस्ट्रेलियाविरुद्ध मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर खेळला होता.
रोहितची वनडे आणि टी-20 कारकीर्दरोहित शर्माने आतापर्यंत 273 एकदिवसीय सामन्यांमध्ये 48.77 च्या सरासरीने 11168 धावा केल्या आहेत. त्याने 32 शतके आणि 58 अर्धशतके झळकावली आहेत. तर, त्याने 159 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 29.76 च्या सरासरीने 6868 धावा केल्या आहेत. या फॉर्मॅटमध्ये त्याने 5 शतके आणि 32 अर्धशतके झळकावली आहेत. गेल्या टी-20 विश्वचषकात भारताला चॅम्पियन बनवल्यानंतर रोहित शर्माने या फॉरमॅटमधून निवृत्ती घेतली होती.