Rohit Pawar: राष्ट्रवादी काँग्रेस शरचंद्र पवार पक्षामध्ये मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. जयंत पाटील यांनी राजीनामा दिल्यानंतर शशिकांत शिंदे यांची प्रदेशाध्यक्षपदी निवड करण्यात आली. त्यानंतर आता आमदार रोहित पवार यांनाही पक्षाकडून मोठी जबाबदारी देण्यात आली आहे. रोहित पवारांकडे प्रदेश सरचिटणीसपद देण्यात आले आहे. महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस तसेच सर्व फ्रंटल आणि सेलच्या प्रभारीपदी रोहित पवार यांची निवड करण्यात आल्याची माहिती कार्याध्यक्षा सुप्रिया सुळे यांनी दिली. सुप्रिया सुळे यांनी एक्स पोस्टवरुन ही माहिती दिली.
जयंत पाटील यांनी मंगळवारी प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर शशिकांत शिंदे यांची प्रदेशाध्यक्षपद एकमताने निवड करण्यात आली. यानंतर आमदार रोहित पवार यांना पक्षाकडून मोठी जबाबदारी देण्यात आली आहे. सुप्रिया सुळे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत रोहित पवार यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत. यशवंतराव चव्हाण आणि शरद पवार यांच्या विचारांचा वस्तुपाठ डोळ्यांसमोर ठेवून ते काम करत असल्याचे सुप्रिया सुळे म्हणाल्या.
"नॅशनलिस्ट कॉंग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस तसेच सर्व फ्रंटल आणि सेलच्या प्रभारीपदी आमदार रोहित पवार यांची निवड करण्यात आली. रोहित यांच्या नेतृत्वाखाली पक्षाची संघटनात्मक बांधणी आणखी मजबूत होईल याची खात्री आहे. स्व. यशवंतराव चव्हाण साहेब आणि आदरणीय पवार साहेब यांच्या विचारांचा वस्तुपाठ डोळ्यांसमोर ठेवून ते काम करीत आहेत. नूतन प्रांताध्यक्ष शशिकांत जी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली राज्याची शिव फुले शाहू आंबेडकर ही वैचारिक चौकट अधिक भक्कम करण्यासाठी ते सदैव कार्यरत राहतील हा विश्वास आहे. त्यांचे या नवीन जबाबदारीबद्दल हार्दिक अभिनंदन तसेच पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा," असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं.