रेल्वे प्रवाशांना लुटणारी टोळी जेरबंद
By Admin | Updated: July 20, 2016 02:12 IST2016-07-20T02:12:02+5:302016-07-20T02:12:02+5:30
प्रवाशांसोबत ओळख वाढवून त्यांना चहा अथवा सिगारेटमधून गुंगीचे औषध देत त्यांना लुटणाऱ्या एका टोळीला कुर्ला रेल्वे पोलिसांनी अटक केली.

रेल्वे प्रवाशांना लुटणारी टोळी जेरबंद
मुंबई : प्रवाशांसोबत ओळख वाढवून त्यांना चहा अथवा सिगारेटमधून गुंगीचे औषध देत त्यांना लुटणाऱ्या एका टोळीला कुर्ला रेल्वे पोलिसांनी अटक केली. पकडण्यात आलेले सर्व आरोपी हे सराईत गुन्हेगार असून त्यांनी अशाच प्रकारे अनेक प्रवाशांना लुटल्याची माहिती रेल्वे पोलिसांनी दिली.
गुजरात येथे राहणारा नसीम खान (३०) हा प्रवासी रविवारी रात्री ट्रेनला उशीर असल्याने लोकमान्य टिळक टर्मिनस येथील आरक्षण कक्षात बसला होता. या दरम्यान टोळीतील आरोपी जियालाल भारतीय (४५), राजेश पाल (३०)आणि राजू भारतीय (३२) हे तिघे याठिकाणी आले. या आरोपींनी नसीम खानसोबत ओळख वाढवत त्याच्याशी मैत्री केली. काही वेळानंतर त्याला त्यांनी चहा आणि सिगारेट ओढण्यासाठी दिली. त्यात गुंगीचे औषध असल्याने काही वेळातच नसीमची शुद्ध हरपली. याचाच फायदा घेत आरोपींनी त्याच्याजवळ असलेली चार हजारांची रोख रक्कम लंपास करत पोबारा केला. नसीम बराच वेळ त्याठिकाणी असल्याने पोलिसांना संशय आला. त्यांनी त्याला उठवण्याचा प्रयत्न केला. मात्र तो उठत नसल्याने पोलिसांनी तत्काळ त्याला राजावाडी रुग्णालयात दाखल केले. शुद्धीवर आल्यानंतर त्याने पोलिसांना घडलेला प्रकार सांगितला. त्यानुसार कुर्ला रेल्वे पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपींचा शोध सुरु केला.
हे तिन्ही आरोपी पुन्हा लोकमान्य टिळक टर्मिनस परिसरात फिरत असल्याची माहिती कुर्ला रेल्वे पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचत या आरोपींना अटक केली आहे. चौकशी दरम्यान अशाप्रकारे अनेक प्रवाशांना लुटल्याची कबुली या आरोपींना पोलिसांना दिली असून त्या आधारे पोलीस अधिक तपास करत आहेत. (प्रतिनिधी)