दरोडेखोर पोलिसाला अटक
By Admin | Updated: December 28, 2014 01:33 IST2014-12-28T01:33:20+5:302014-12-28T01:33:20+5:30
स्टेट बँकेची ३० लाख रुपयांची रोकड पळवून नेणाऱ्या निलंबित पोलिसासह जालना जिल्ह्णातील सहा दरोडेखोरांच्या मुसक्या आवळण्यात आल्या.

दरोडेखोर पोलिसाला अटक
मेहकर (जि. बुलडाणा) / नाशिक : स्टेट बँकेची ३० लाख रुपयांची रोकड पळवून नेणाऱ्या निलंबित पोलिसासह जालना जिल्ह्णातील सहा दरोडेखोरांच्या मुसक्या आवळण्यात आल्या. त्यांच्याकडून २५ लाख रुपये व इतर साहित्य जप्त करण्यात आले. लहू ऊर्फ लकी पंडित (जालना), आकाश थेटे, सुदर्शन थेटे (दोघेही जालना), शिवाजी भागडे (जालना), ज्ञानदेव खरात (जालना), गोविंद डोंगरे (जालना) अशी अटक करण्यात आलेल्या दरोडेखोरांची नावे असून, भागडे हा निलंबित पोलीस आहे.
सिंदखेडराजा तालुक्यातील साखरखेर्डा येथील स्टेट बँक आॅफ इंडियाच्या शाखेची रोकड नेणारी व्हॅन अडवून शुक्रवारी या दरोडेखोरांनी ३० लाख रुपये लंपास केले होते. पोलिसांनी नाकाबंदी केली. या लुटारूंच्या गाडीचा रस्ता चुकल्याने किनगावराजा नदीपात्रात त्यांची जीप फसली. पोलीस जवळ येताच दरोडेखोरांनी त्यांच्यावर गोळीबार केला. यावेळी लहू उर्फ लकी पंडित जाधव याला पकडले. तर किनगाव नदीच्या बाजूला दुसरा आरोपी हाती लागला. तिसऱ्या दरोडेखोराला रात्री उशिरा जालना येथून अटक केली. त्यांच्याकडून २५ लाख जप्त केले.
याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात गावठी कट्टा बाळगल्याचा स्वतंत्र गुन्हा तिघांविरुद्ध दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणातील मदन भागडे व त्याचा एक साथीदार मुंबईकडे फरार झाल्याची माहिती आहे. (वार्ताहर)