फूटपाथवर झोपलेल्यांना बेदम मारहाण करून लूट
By Admin | Updated: May 8, 2014 12:22 IST2014-05-08T12:22:39+5:302014-05-08T12:22:39+5:30
दोघे ताब्यात; विचारेमाळ परिसरातील फाळकूटदादांचा उच्छाद

फूटपाथवर झोपलेल्यांना बेदम मारहाण करून लूट
कोल्हापूर : शहरात रस्त्यावर फूटपाथवर झोपलेल्या नागरिकांना अमानुषपणे मारहाण करीत त्यांच्या खिशातील पैसे व मोबाईल लूटमार करणार्या विचारेमाळ येथील दोघा संशयित फाळकूटदादांना काल (मंगळवार) मध्यरात्री लक्ष्मीपुरी पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्याकडे पोलीस चौकशी करीत असून, त्यांचे आणखी पाच ते सहा साथीदार पसार झाले आहेत. याबाबत पोलिसांनी सांगितले, शहरात रंकाळा स्टॅन्ड, गंगावेश, शिवाजी चौक, सीपीआर, लक्ष्मीपुरी फोर्ड कॉर्नर परिसरातील फूटपाथवर झोपलेल्या नागरिकांना सात ते आठ फाळकूटदादांनी बेदम मारहाण करीत त्यांच्याजवळील पैसे व मोबाईल काढून घेत चालले होते. अचानक झालेल्या मारहाण आणि लूटमारीमुळे नागरिक बिथरून गेले. सीपीआरच्या आवारात झोपलेल्या एका नागरिकाला मारहाण करून त्यांनी त्याच्याजवळील आठशे रुपये काढून घेतले. यावेळी एका जागरूक नागरिकाने हा प्रकार लक्ष्मीपुरी पोलिसांना सांगितला. येथील गुंडाविरोधी पथकाचे प्रमुख आठरे यांनी तातडीने पोलीस फौजफाटा घेऊन या फाळकूटदादांचा पाठलाग केला. शाहूपुरी पोलिसांचे बिट मार्शलही या फाळकूटदादांचा शोध घेऊ लागले. अखेर लक्ष्मीपुरी कोंडाओळ येथे दोघे तरुण पोलिसांच्या हाती लागले. तर इतर पसार झाले. ताब्यात घेतलेल्या दोघा तरुणांकडे लक्ष्मीपुरी पोलिसांनी रात्रभर कसून चौकशी केली. त्याने अन्य साथीदारांची नावे सांगितली. त्यानुसार पोलिसांनी त्यांच्या घरांची झडती घेतली असता ते मिळून आले नाहीत. सदर बझार, विचारेमाळ येथील हे फाळकूटदादा असल्याचे समजते. याप्रकरणी दोघा फाळकूटदादांकडे चौकशी सुरू असून उद्या (गुरुवार) सर्व चित्र स्पष्ट होईल. (प्रतिनिधी)