मुंबईतील रस्त्यांची कामे ठप्प

By Admin | Updated: May 4, 2017 06:38 IST2017-05-04T06:38:46+5:302017-05-04T06:38:46+5:30

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या दगडखाणीवर हरित लवादाने बंदी आणल्याने मुंबईला खडीचा

Road work in Mumbai jam | मुंबईतील रस्त्यांची कामे ठप्प

मुंबईतील रस्त्यांची कामे ठप्प

मुंबई: महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या दगडखाणीवर हरित लवादाने बंदी आणल्याने मुंबईला खडीचा पुरवठा बंद झाला आहे. त्यामुळे मुंबईतील रस्त्यांची कामे ठप्प झाली आहेत. यावर तोडगा काढण्यासाठी एकीकडे शिवसेनेचे नेते मुख्यमंत्र्याच्या दरबारात गेले असताना, त्यांच्या शिलेदारांनी मात्र, भाजपावरच निशाणा साधला आहे. यामुळे भाजपा नगरसेवकांमध्ये तीव्र नाराजी पसरली असून, बेकायदा कामांसाठी मुख्यमंत्र्यांना मध्यस्थी करण्यास भाग पाडू नये, असे त्यांनी शिवसेनेच्या नगरसेवकांना सुनावले आहे. त्यामुळे उभय पक्षामध्ये नव्या वादाला तोंड फुटले आहे.
खाणींवर बंदी असल्याने रस्त्यांसाठी मिळणारी खडी बंद झाली आहे. माल मिळत नसल्याने ठेकेदारांनी रस्त्यांचे काम थांबवले आहे. यामुळे पावसाळ्यात मुंबईतील रस्ते खड्ड्यात जातील, अशी भीती व्यक्त होत आहे. खडीचा पुरेसा साठा नसल्याने, रस्त्यांची कामे करता येत नसल्याची हतबलता पालिका प्रशासनानेही आज व्यक्त केली. यामुळे अडचणीत आलेल्या सत्ताधारी शिवसेनेने हे प्रकरण भाजपावर शेकवण्याची तयारी केली आहे. रस्त्यांच्या कामाचा प्रस्ताव मंजुरीसाठी आला असता, शिवसेना आणि भाजपामध्ये जोरदार खडाजंगी झाली. (प्रतिनिधी)

शिवसेना-भाजपा आमने सामने

दगडखाणी बंद करून रस्त्यांची कामं ठप्प करणे हे भाजपाचे षडयंत्र असल्याचा आरोप सभागृह नेते यशवंत जाधव यांनी केले. मात्र, मुख्यमंत्र्यांच्या नावाचा उल्लेख केल्याने भाजपाचे नगरसेवक संतप्त झाले. दगडखाणी बंद केल्याने रस्त्यांची कामे रखडल्याचे खापर तुम्ही मुख्यमंत्र्यांवर फोडू नका, अशी भूमिका घेत, भाजपा गटनेते मनोज कोटक यांनी शिवसेनेला सुनावले.
पर्यावरणमंत्र्यांना तुम्ही का भेटत नाही, असा सवालही त्यांनी शिवसेनेला केला. त्यावर दगडखाणी बंद करण्यासाठी हीच वेळ का निवडण्यात आली, असा सवाल जाधव यांनी केला.


शिवसेना मुख्यमंत्र्यांच्या दरबारात


युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी या प्रकरणी देवेंद्र फडणवीस यांची आज भेट घेतली. याबाबत माहिती देताना प्रशासनाने अप्रत्यश ठाकरे यांची प्रशंसा केली. यामुळे चिडलेल्या भाजपा नगरसेवकांनी माल मिळविण्याची जबाबदारी ठेकेदारांची असल्याचे स्मरण करून दिले.

तरच ३० मे पर्यंत  रस्ते होतील

खडी मिळवण्याचे काम ठेकेदारांचे असल्याने त्यांच्यावर नियमांनुसार दंडात्मक कारवाई सुरू आहे. मात्र, पावसाळ्यात मुंबईकरांची गैरसोय टाळण्यासाठी खडी मिळवण्याचे प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत. त्यात यश आल्यास ३० मे पर्यंत रस्त्यांची कामे उरकण्यात येतील, असे आश्वासन अतिरिक्त आयुक्त पल्लवी दराडे यांनी स्थायी समितीला दिले.

ठेकेदारांना दिरंगाईचा दंड

निविदेतील अटी ठेकेदारांना बंधनकारक असून, रस्ते कामात दिरंगाई करणाऱ्या काही ठेकेदारांवर गुन्हे दाखल केले आहेत. ११ ठेकेदारांना कारणे दाखवा नोटिसा दिल्या असल्याची माहिती रस्ते अभियंत्यांनी दिली. ज्या ठेकेदारांना रस्त्यांची कामे दिली आहेत. त्यांच्याकडून निविदेतील अटी आणि शर्थीनुसार रस्त्यांची कामे करून घेऊन दगडखाणी बंद झाल्या, तरी त्यांनी कुठूनही खडी आणावी आणि रस्त्यांची कामे वेळेत करावीत, अशी भूमिका प्रशासनाने स्थायी समितीत मांडली.

५० हजार क्युबिक मीटर खडी हवी
रस्त्यांच्या पावसाळ्यापूर्व कामांसाठी महापालिकेला ५० हजार क्युबिक मीटर खडीची गरज आहे. मात्र, नवी मुंबईतील उत्खननावर बंदी आल्याने ठेकेदारांना आता मुंबईबाहेरील दगडखाणींतून खडी घ्यावी लागणार आहे.
खडी मिळत नसल्याने पाच ते सहा ठेकेदारांची कामे रखडली असून, मे अखेरीपर्यंत कामे पूर्ण होणे शक्य होणार नाही. अशांवर महापालिका कायदेशीर कारवाई करण्याचा विचार करीत आहे.
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाचे नियम पाळत नसलेल्या ७० दगडखाणींवर ३१ मार्चपासून बंदी आहे.

दगडखाणींवर बंदी असल्याने रस्त्यांच्या कामासाठी मिळणारी खडी बंद झाली आहे. माल मिळत नसल्याने ठेकेदारांनी रस्त्यांचे काम थांबवले आहे. यामुळे पावसाळ्यात मुंबईतील रस्ते खड्ड्यात जातील, अशी भीती व्यक्त होत आहे. खडीचा पुरेसा साठा नसल्याने रस्त्यांची कामे करता येत नसल्याची हतबलता पालिका प्रशासनानेही आज व्यक्त केली.

Web Title: Road work in Mumbai jam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.