रस्ता रुंदीकरण वादग्रस्त

By Admin | Updated: June 10, 2016 03:34 IST2016-06-10T03:34:09+5:302016-06-10T03:34:09+5:30

फेरीवाल्यांना संरक्षण देणारी मीरा-भार्इंदर मनपा नियम धाब्यावर बसवून रस्ता रुंदीकरण करत असल्याचा आरोप आहे.

Road widening controversy | रस्ता रुंदीकरण वादग्रस्त

रस्ता रुंदीकरण वादग्रस्त


भार्इंदर : रस्ते, पदपथांवर अतिक्रमण करणाऱ्या फेरीवाल्यांना संरक्षण देणारी मीरा-भार्इंदर मनपा नियम धाब्यावर बसवून रस्ता रुंदीकरण करत असल्याचा आरोप आहे. त्यातच आता रुंदीकरणातील घोटाळे समोर येत आहेत. रुंदीकरणादरम्यान मुन्शी कम्पाउंडमध्ये काहींची दुकाने, घरे वाचावीत, यासाठी पालिकेच्या सीमारेषेप्रमाणे ती तोडलेली नाही.
कारवाईपूर्वी पालिकेने बांधकाम कुठपर्यंत तोडायचे, याची सीमारेषा आखली होती. परंतु, महापालिका अधिकारी व कंत्राटदाराने येथील शादाब हॉटेलपासून पुढे सीमारेषेनुसार बांधकामे तोडलेलीच नाही. एवढेच नव्हे तर नाला बांधण्यास घेतला असून तोही सीमारेषेच्या बाहेर नागमोडी वळणे घेत बनवला आहे.
कार्यकारी अभियंता शिवाजी बारकुंड यांनी घटनास्थळी सर्व वस्तुस्थिती पाहूनही कारवाई केली नाही. काहींची दुकाने व घरे वाचवण्यासाठी ही ‘अर्थपूर्ण’ तडजोड झाल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. वादग्रस्त आमदारासह स्थानिक नगरसेविका व पालिका अधिकाऱ्यांचे संगनमत असल्याशिवाय रुंदीकरण घोटाळा शक्य नसल्याचा आरोप येथील कारवाईने बाधित अन्वर अली मन्सुरी यांनी केला आहे. यामुळे महापालिकेची ही संपूर्ण कारवाई आता संशयाच्या भोवऱ्यात सापडलेली आहे. (वार्ताहर)
>विचारणा करणाऱ्याला
‘गुन्हा दाखल करू’ची धमकी
पालिकेचे कनिष्ठ अभियंता प्रफुल्ल वानखेडे यांना सीमारेषेपर्यंत बांधकाम का तोडले नाही, अशी विचारणा घटनास्थळी रहिवाशांनी व मी केली असता उलट पोलिसात गुन्हा दाखल करण्याची धमकी वानखेडेने दिल्याचे सय्यद अलीखान यांनी सांगितले.
पालिकेकडून मनमानी
मी येथे १९८० पासून राहत आहे. पालिकेने आमच्याकडील पुरावे न पाहताच बांधकाम तोडले. नुकसानभरपाई, मोबदला तर काहीच मिळाला नाही. उलट, पालिकेने अर्धे घर, दुकान तोडल्याने त्याच्या बांधकामासाठीच दीड ते दोन लाखांचा भुर्दंड आम्हाला सहन करावा लागला.
कामाच्या पाहणीसाठी जाणार : खांबित
आयुक्त अच्युत हांगे व शहर अभियंता शिवाजी बारकुंड यांच्याशी संपर्क साधला असता तो होऊ शकला नाही. तर, कार्यकारी अभियंता दीपक खांबित यांच्याशी संपर्क साधला असता आपण प्रत्यक्ष कामाची पाहणी करण्यासाठी जाणार आहे, असे ते म्हणाले.

Web Title: Road widening controversy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.