रेवदंडा येथील रस्त्याची दुरवस्था
By Admin | Updated: July 4, 2016 03:25 IST2016-07-04T03:25:31+5:302016-07-04T03:25:31+5:30
अलिबाग तालुक्यातील रेवदंडा येथे रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असून यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत.

रेवदंडा येथील रस्त्याची दुरवस्था
बोर्ली-मांडला /मुरुड : अलिबाग तालुक्यातील रेवदंडा येथे रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असून यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. या खराब रस्त्यांवरून गाडी चालवताना मोठी कसरत करावी लागत असून खड्ड्यांचे सोयरसुतक हे बांधकाम विभागाला नाही.
रेवदंडा येथील मोठे बंदर ते गोळा बस स्थानक आणि पारनाका ते हायस्कूलदरम्यान मोठमोठे खड्डे पडले आहेत. पावसाळ्यापूर्वी या रस्त्याची नावापुरतीच डागडुजी करण्यात आली मात्र पहिल्याच पावसात रस्त्याची फार दैना उडाली आहे. रेवदंडा मोठे बंदर ते गोळा स्थानक या दरम्यान रेवदंडा पुलाजवळ तसेच आगरकोट किल्ल्याकडे जाणाऱ्या रस्त्यापासून ते गोळा स्थानक आणि पारनाका ते हायस्कूल या दरम्यान मोठे खड्डे पडले आहे. या खड्ड्यातून वाहन चालवीत असताना खड्ड्यातील पाणी हे बाजूने जरा पादचारी अथवा वाहनचालकाच्या अंगावर उडत असते, त्यामुळे अनेकवेळा भांडणेही होतात. रेवदंडा बंदर येथे पडलेल्या खड्ड्यानजीक तसेच हायस्कूलजवळ पसरलेल्या खड्ड्यानजीक उपाहारगृहे आहे. त्या उपाहारगृहामध्ये ग्रामस्थ पदार्थ खाण्यासाठी जात असतात. पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यात पाणी साचल्याने या ठिकाणी डासांची तसेच चिलटांची पैदास होऊन साथीचे रोग पसरण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याचप्रमाणे पडलेल्या मोठ्या खड्ड्यातून तीनचाकी वाहन एका बाजूला पलटी होण्याची सुद्धा शक्यता नाकारता येत नाही असे वाहनचालक प्रशांत भोईर यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
रेवदंडा गोळा स्थानक ते केळकर स्थानक दरम्यानच्या रस्त्याचे सिमेंट काँक्र ीटीकरण करण्याचे काम पावसाळा सुरु होण्यापूर्वी होणे गरजेचे होते मात्र त्या रस्त्याचे काम अद्यापपर्यंत सुरू नसल्याने प्रवासी आणि विद्यार्थी यांना राज्यपरिवहन महामंडळाची बस पकडण्यासाठी जवळपास एक किलोमीटर अंतरावर म्हणजे रेवदंडा चौल बाह्यवळणावर यावे लागत आहे. या रस्त्याचे काम सुरू केले असल्याने रेवदंडा गावात फक्त विक्र म, मिनीडोर, छोटी चारचाकी आणि दुचाकी वाहने ये -जाकरीत आहेत. ही वाहने गोळा स्थानक -कालभैरव मंदिर मार्गे पारनाका अशी वळविण्यात आली आहेत. (वार्ताहर)
>रेवदंडा येथील रस्त्यासाठी अंदाजपत्रक बनविण्याचे काम सुरु
रेवदंडा येथे पहिल्याच पावसात खड्डे पडले असून त्याची दुरु स्ती करण्यासाठी अंदाजपत्रक बनविण्याचे काम सुरू असून ते लवकरच पूर्ण करण्यात येऊन तो वरिष्ठांकडे सादर करण्यात येईल. त्यांच्याकडून प्रशासकीय मान्यता मिळाल्यानंतर काम लवकरच पूर्ण करण्यात येईल.
- रोहित कुडतरकर,
कनिष्ठ बांधकाम उप विभाग, अलिबाग