मेट्रो साकारणार विकासाचा ‘रोड मॅप’
By Admin | Updated: August 21, 2014 01:19 IST2014-08-21T01:19:48+5:302014-08-21T01:19:48+5:30
विकासाच्या दिशेने वाटचाल सुरू असलेल्या नागपूर शहरातील मेट्रो रेल्वे प्रकल्पाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते उद्या, गुरुवारी भूमिपूजन होत आहे. या प्रकल्पामुळे विकासाला गती मिळणार आहे.

मेट्रो साकारणार विकासाचा ‘रोड मॅप’
उपराजधानी होणार सुपरफास्ट : प्रकल्पाच्या भूमिपूजनासोबत कामांनाही येणार गती
नागपूर : विकासाच्या दिशेने वाटचाल सुरू असलेल्या नागपूर शहरातील मेट्रो रेल्वे प्रकल्पाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते उद्या, गुरुवारी भूमिपूजन होत आहे. या प्रकल्पामुळे विकासाला गती मिळणार आहे. सोबतच २५ लाख नागरिकांची मेट्रो रेल्वे प्रवासाची स्वप्नपूर्ती होणार असल्याने शहरासाठी हा दिवस ऐतिहासिक ठरणार आहे. मेट्रो रेल्वे खऱ्या अर्थाने उपराजधानीच्या विकासाचा ‘रोड मॅप’ साकारणार आहे.
वाढती लोकसंख्या व वाहनांची होणारी गर्दी यामुळे शहरात वाहतुकीची कोंडी होऊ लागली आहे. मेट्रोमुळे ही समस्या मार्गी लागणार आहे. नागपूर शहरातील दोन मेट्रो मार्गांना यापूर्वी मंजुरी देण्यात आली आहे. शहरातील आॅटोमोटिव्ह चौक ते मिहान आणि प्रजापती नगर ते लोकमान्यनगर असे दोन मेट्रोमार्ग आहेत. या मार्गांची एकूण लांबी ३८.२ किलोमीटर आहे. सहा वर्षात हा प्रकल्प पूर्ण करण्यात येणार आहे.
महागाई निर्देशांकानुसार या प्रकल्पाची किंमत वाढून १०५२६ कोटींवर गेली आहे. या वाढीव किंमतीच्या प्रस्तावास नुकतेच मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मंजुरी दिली होती. त्यानंतर हा प्रस्ताव केंद्र सरकारच्या पीआयबी(पब्लिक इन्व्हेस्टमेंट बोर्ड)कडे पाठविण्यात आला. दिल्ली येथे पीआयबीच्या बैठकीत दुरुस्त्या व सुधारणानंतर ८ हजार ६८० कोटी रुपयांचा प्रस्ताव केंद्रीय मंत्रिमंडळाकडे मंजुरीसाठी पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या प्रस्तावाला बुधवारी केंद्रीय मंत्रीमंडळाने मंजुरी दिली. दिल्ली मेट्रोरेल कार्पोरेशन कंपनी यांनी नागपूर मेट्रो रेल्वेचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार केला आहे. या दोन्ही मार्गिकांच्या प्रस्तावाला केंद्र शासनाने तत्त्वत: मान्यता दिली होती.
नागपूर मेट्रोसाठी नागपूर मेट्रो कार्पोरेशन लिमिटेड नावाने एक स्पेशल पर्पज व्हेईकल(एसीव्ही)कंपनी स्थापन करण्यात आली आहे. नागपूर मेट्रो रेल्वे कार्पोरेशन लि.या कंपनीस या प्रकल्पाच्या अंमलबजावणी संदर्भातील अधिकार देण्यात येणार आहे. तसेच ही कंपनी स्थापन होईपर्यत नागपूर सुधार प्रन्यास या प्रकल्पासाठी कार्यान्वयीन संस्था म्हणून काम पाहात आहे. या प्रकल्पात केंद्र शासनाचा २० व राज्य शासनाचा २० टक्के तर महापालिका व नासुप्रचा प्रत्येकी ५ टक्के सहभाग राहणार आहे. उर्वरित ५० टक्के निधी कर्ज आणि इतर स्रोताव्दारे उभारला जाणार आहे. (प्रतिनिधी)
असे असतील स्टेशन
कॉरिडोर -१
आॅटोमोटिव्ह चौक ते मिहान
आॅटोमोटिव्ह चौक
नारी रोड
इंदोरा
कडबी चौक
गड्डीगोदाम चौक
कस्तूरचंद पार्क
झिरो माइल
सीताबर्डी
कांग्रेसनगर
रहाटे कॉलनी
अजनी चौक
छत्रपति चौक
जयप्रकाश नगर
उज्ज्वलनगर
जुने विमानतळ
नवे विमानतळ
खापरी
असे असतील स्टेशन
कॉरिडोर -२
प्रजापतिनगर ते लोकमान्य नगर
प्रजापतीनगर
वैष्णो देवी चौक
आंबेडकर चौक
टेलीफोन एक्सचेंज
चितारओळी चौक
दोसर वैश्य चौक
नागपूर रेलवे स्टेशन
सीताबर्डी (इंटरचेंज)
झांशी राणी चौक
इंस्टीट्यूट आॅफ इंजिनिअर्स
बँक आॅफ इंडिया, शंकरनगर
लाड चौक
धरमपेठ सायन्स कॉलेज
सुभाषनगर
रचना रिंगरोड जंक्शन
वासुदेवनगर
बंसीनगर
लोकमान्यनगर