पाणी साचण्याचा धोका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2016 01:13 IST2016-05-17T01:13:44+5:302016-05-17T01:13:44+5:30
सिमेंटचे रस्ते करताना पावसाळी गटारे स्वच्छ करण्याची काळजी घेण्यात आलेली नाही.

पाणी साचण्याचा धोका
पुणे : सिमेंटचे रस्ते करताना पावसाळी गटारे स्वच्छ करण्याची काळजी घेण्यात आलेली नाही. अशा रस्त्यांवर पाणी मुरत नसल्याने पावसाचे पाणी जास्त प्रमाणात साचेल. ते वाहून गेले नाही, तर साचून राहण्याचा धोका असल्याने पावसाळी गटारे, नाले स्वच्छ करण्याचे काम त्वरित सुरू करावे, अशी मागणी वडगाव शेरी नागरिक मंचने केली आहे.
नगर रस्ता परिसरामध्ये पावसाळ्यात दर वर्षी मोठ्या प्रमाणात पाणी साचते. काही महिन्यांपूर्वी झालेल्या अवकाळी पावसात या परिसरातील अनेक वस्त्यांमध्ये पाणी शिरले होते. गटारींमधून पाणी वाहून जात नसल्याने ते रस्त्यावर साचून राहते व त्यातून अपघात होतात. त्यातच मागील काही महिन्यांमध्ये वडगाव शेरी व इतर परिसरातील अगदी गल्लीबोळातही सिमेंट काँक्रीटचे रस्ते तयार केले गेले. त्यामुळेच या भागात पुन्हा पाणी तुंबण्याची भीती व्यक्त केली जात आहे, असे वडगाव शेरी नागरिक कृती मंचचे म्हणणे आहे. त्यामुळेच क्षेत्रीय कार्यालयाने या भागाच्या प्रभागनिहाय बैठका आयोजित करून नागरिकांकडून माहिती करून घ्यावी व त्यांनी सुचवलेले नाले, गटारी यांची त्वरित स्वच्छता करून घ्यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. आयुक्त कुणाल कुमार यांनी ३० मेपूर्वी शहरातील सर्व नाले व गटारी स्वच्छ करण्याचे आदेश दिले असले, तरी क्षेत्रीय कार्यालयांनी त्याची फारशी दखल घेतली गेली नसल्याचेच दिसते आहे. (प्रतिनिधी)